महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात केलेल्या विकासकामांचा डंका पिटण्यासाठी मनसेने आता मराठी सिनेसृष्टीचा आधार घेतला असून डझनापेक्षा अधिक कलाकार व दिग्दर्शकांची फौज मंगळवारी शहरातील विकासकामांना भेट देणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना खासगीकरणाद्वारे प्रकल्प पूर्णत्वास आणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे नवनवीन खेळी खेळत आहेत. मराठी सिने व नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार मंगळवारी दुपारी अडीच वाजता पक्षाने केलेल्या  विकासकामांना भेट देणार आहेत.
यामध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, अलका कुबल, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय मोने, पुष्कर क्षोत्री, रवी जाधव, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, मेधा मांजरेकर, मुग्धा कर्णिक, मेघा धाडे, माधवी निमकर, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव , सचित पाटील, आनंद इंगळे यांच्यासह अमित ठाकरे व म.न.से चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा समावेश आहे.
महापालिकेत सत्तेत असताना पक्षाने केलेल्या शहरातील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक शस्त्रसंग्रहालय, गांधी तलावातील शंभरफुटी कारंजा, होळकर पुलाखालील रंगीत पडदा (वॉटर कर्टन),  बॉटनिकल गार्डन, उड्डाणपूला खालील सुशोभिकरण, सुशोभित वाहतुक बेटे इत्यादी  कामांना हे कलाकार भेट देणार आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरातील ‘मनसे’ रेल्वे इंजिनचे एक-एक डबे कमळाकडे आकर्षित झाल्याने या इंजिनाला वेगाने धावत नव नवीन निसर्ग चित्र नाशिककरांना दाखवण्याची वेळ आली आहे. माझ्या तोंडून ही विकास कामे ऐकण्यापेक्षा आता कलाकारांकडून ऐका अशी खेळी राज आजमावत तर नाही ना, अशी शंका नाशिककरांच्या मनात आहे. मनसेच्या डब्यांना नमो इंजिन मिळाल्याने पक्षाला आचारसंहिता लागण्यापूर्वी आपली साख वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. बॉटनिकल गार्डन व उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण कामांचे उद्घाटन अलीकडेच अभिनेता नाना पाटेकर व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. आता पक्षाने केलेली ही सर्व कामे या इतर कलाकारांना दाखवून त्यांच्या तोंडून ती लोकांपर्यंत पोहचवण्याची राज यांची खेळी दिसते. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या माजी मनसे नगरसेवकांनी नमो नमोचा जागर करत ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच दणका दिला आहे. मनसेच्या ४० पैकी २७ नगरसेवकांनी पक्षाला राम राम ठोकत पक्षासमोर अडचण निर्माण केली आहे. त्यामुळे नाशिककरांचे मन वळवण्यासाठी राज यांची ही खेळी यशस्वी होते का, हे येणाऱ्या महापालिकेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.