जादूटोणा विरोधातील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण कमी

जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रबोधन व प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात आतापर्यंत ३५०हून अधिक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले असले तरी त्यातील गुन्हा सिद्धतेचे प्रमाण कमी असल्याने संशयितांना शिक्षा होण्यास अडचणी उद्भवत आहेत. दाखल गुन्ह्य़ांवर नजर टाकल्यास भूलथापा देत राज्यातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांमध्ये परप्रांतीय भोंदूबाबांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यास मर्यादा येतात. त्यांचा भांडाफोड झाल्यावर एकतर ते बाहेरील राज्यात पळून जातात किंवा आपल्या सावजाला परराज्यात बोलवत असल्याचे समोर आले आहे.

बस, रेल्वे स्थानकासह वर्तमानपत्रे, भ्रमणध्वनी यासह समाजमाध्यमांवर पैसे दुप्पट करून देणे, पैशांचा पाऊस, पुत्रप्राप्ती, वशीकरण यासह व्यवसाय-कौटुंबिक वाद यावर तोडगा काढण्याचा हमखास उपाय या मथळ्याखाली जाहिराती प्रसिद्ध होताना दिसतात. या जाहिरातीत भ्रमणध्वनी क्रमांक देऊन सावज शोधण्याचा प्रयत्न भोंदूगिरी करणाऱ्यांकडून होत असतो. महाराष्ट्रात हे प्रमाण सर्वाधिक आहे. रेल्वेमधून अशा बंगालीबाबा व इतरांची जाहिरात करण्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी आणली असली तरी अद्याप हे प्रकार सुरू आहेत. यातून काही ठिकाणी नरबळीचाही प्रयत्न झाला असून अद्याप त्या संशयितापर्यंत तपास यंत्रणेला पोहोचता आलेले नाही. अशी अनेक प्रकरणे असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे.

पालघरमधील वाडा गावात शामला भुजड या महिलेच्या आजारपणास व मुलाच्या मृत्यूस लडकु वरठा हा व्यक्ती जबाबदार असल्याचे मांत्रिकाने सांगितल्याने त्याची हत्या करण्यात आली. हा सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचा पोलीस शोध घेत आहेत. नाशिकच्या हरसूल परिसरातील रेखा राऊत हिचा मृतदेह घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या मृतदेहाशेजारी पुजेचे साहित्य सापडले.

या नरबळीचा पोलीस तपास करीत आहेत. बोरिवली येथे मांत्रिक गुरटय़ा दासरीने पहाटे आरती करत तक्कु शिंदे याची तलवारीने हत्या केली. मालेगाव येथे तहेसिना शेख जामिल या मुलीचा शनी अमावास्येच्या रात्री संशयास्पद खून झाला. तिच्या मृतदेहाजवळ जादूटोणा व काळ्या विद्येची पुस्तके  सापडली. सोलापूर येथील निखिल जानकर व यवतमाळच्या गौरी गिरी अशा काही प्रकरणांचा अद्याप शोध सुरू आहे. अनेकदा हे प्रकार उघडकीस येत असल्याचे लक्षात आले की, ही मंडळी परागंदा होतात किंवा सावजाला भुलवत स्थळ बदलून त्याच्या संपर्कात राहतात, असे अंनिसचे निरीक्षण आहे.

या संदर्भात ‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांनी बऱ्याचदा वर्तमानपत्र किंवा सार्वजनिक ठिकाणी हाती पडलेल्या एखाद्या कागदावरील जाहिरात पाहात नागरिक भूलथापांना बळी पडतात याकडे लक्ष वेधले. त्यावर दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक तसेच पैसे जमा करण्यासाठी दिलेला खाते क्रमांक हा महिना ते सहा महिन्यांच्या कालावधीत सातत्याने बदलत राहतो. यामुळे त्याचा माग कसा काढावा, यावर पोलिसांना मर्यादा येतात. दुसरीकडे दोन ते दहा हजार रुपयांची फसवणूक असली तर नागरिक तक्रारही करत नाही. उलटपक्षी अशी एखादी तक्रार आली तर पोलिसांच्या लेखी त्याची दखल घेतली जात नसल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

महिलांचे शोषण अधिक

जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्य़ांची व्याप्ती पाहता महिला या प्रामुख्याने अंधश्रद्धेच्या बळी ठरल्या आहेत. त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून शारीरिक व मानसिक शोषण होते. अपत्यप्राप्तीच्या नावाखाली एका महिलेवर ४८ दिवस भोंदूबाबाकडून शारीरिक अत्याचार झाल्याचे उदाहरण आहे. त्यात पतीचेही त्या भोंदूबाबास साहाय्य मिळाले. एखादी महिला डाकीण आहे असे सांगत तिच्यावर सामाजिक जीवनावर बहिष्कार टाकणे, अघोरी पूजेसाठी महिलेकडून पैसे उकळणे, भूत उतरविणे, देवीसमोर नवसापोटी महिलांनी स्वत:ला उलटे टांगून घेणे अशा विविध प्रथा व अघोरी पद्धतीमधून महिलांचे शोषण होत असल्याकडे अंनिसने लक्ष वेधले आहे.

परप्रांतीय भोंदूबाबांचा धुमाकूळ

डोंबिवलीतील कृपाशंकर मिश्रा यांनी आजारपणावरील उपचारासाठी शेख बंगालीबाबाला दहा हजार रुपये दिले. परंतु त्यांची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बंगाली बाबाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नाशिक येथील वाडगाव येथील काशिनाथ कसबे व संजय कसबे यांना राजस्थानमधील बांगडीवालेबाबा व जंगलीबाबा यांनी गुप्तधन काढले नाही तर दैवी कोप होईल अशी भीती घालून तीन लाखांना गंडविले. पूजाविधीचा प्रकार पाहता मुलगा श्रावण याचे मानसिक संतुलन बिघडले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारात बांगडीवालाच्या साथीदाराला अटक आहे. पण मुख्य सूत्रधार फरार. बंगालीबाबाची जाहिरात एसटी बसमध्ये वाचून नागपूरच्या एका तरुणीने समस्येवर इलाज करण्यासाठी बंगालीबाबाशी संपर्क साधला. तिने टप्प्याटप्प्याने ८० हजार रुपये उपचारासाठी दिले. प्रत्यक्ष तिला बोलावत बाबाने लैंगिक शोषण केले. याबाबत जादूटोणा कायद्याचा आधार घेत गुन्हा दाखल झाला आहे.