मराठी भाषा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीत मात्र लोकप्रतिनिधी आणि साहित्यप्रेमींच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रम रद्द होण्याची वेळ आली. महापालिका निवडणुकीच्या ताणामुळे आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी कार्यक्रमांना गैरहजर होते अशी सारवासारव केली जात आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवारी पहाटे ‘कुसुमाग्रज पहाट’ स्मरण यात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र साहित्यप्रेमींची अनुपस्थिती तसेच लोकप्रतिनिधींनी फिरवलेली पहाट यामुळे ‘कुसुमाग्रज पहाट’ हा कार्यक्रम संध्याकाळी घेण्याची नामूष्की आयोजकांवर ओढावली. नाशिक महानगरपालिका निवडणूक आणि त्यासाठी सुरु असलेला प्रचार यामुळे दमलेल्या आमदार तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी आचार संहिता, निवडणुकीचा ताण अशी किरकोळ कारणे देऊन या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती जपण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ तसेच जनस्थान व गोदा गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या संपूर्ण साहित्यमय कार्यक्रमात राजकीय मंडळीना फारसे स्थान नसल्यामुळे लोकप्रतिनिधींनी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी राजभाषा दिनानिमित्त वेगळी चूल मांडली होती. लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने कार्यक्रमांचे आयोजन केले. मात्र प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांचा या लोकप्रतिनिधींना विसर पडला.