‘कुसुमाग्रज पहाट’ कार्यक्रम सायंकाळच्या ‘स्मरण’ यात्रेत

मराठी भाषा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम होत असताना कुसुमाग्रजांच्या नगरीत मात्र लोकप्रतिनिधी व साहित्यप्रेमींच्या अनुपस्थितीमुळे सकाळचा कार्यक्रम गुंडाळण्याची वेळ आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त होणारे कार्यक्रम लक्षात घेत लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने काही कार्यक्रमांची आखणी केली. परंतु निवडणुकीचा नुकताच जाहीर झालेला निकाल तसेच आचारसंहिता अशी कारणे पुढे करत राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमास गैरहजर राहणे पसंत केले. दुसरीकडे, केवळ साहित्यप्रेमींच्या अभावी ‘कुसुमाग्रज पहाट’ कार्यक्रम सायंकाळी स्मरण यात्रेत घेण्याचे नियोजन करत पदाधिकाऱ्यांनी सकाळी अभिवादनास उपस्थित राहणे टाळले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ तसेच सालाबादाआड जनस्थान व गोदा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते. या साहित्यमय कार्यक्रमात राजकीय मंडळांना फारसे स्थान नसल्याने लोकप्रतिनिधी व राजकीय नेतेमंडळी प्रतिष्ठानच्या आवारात अर्थात कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठी राजभाषा दिनानिमित्त दरवर्षी अभिवादनासाठी गर्दी करतात. या वर्षी मात्र अभिवादनाच्या कार्यक्रमाला संबंधितांनी छेद दिल्याचे पाहावयास मिळाले. नुकतीच झालेली महापालिका निवडणूक, प्रभानिहाय होणारा प्रचार यामुळे दमलेल्या आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी आचारसंहिता, निवडणुकीचा ताण आदी फुटकळ कारणे देत कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली. ‘मराठी’चे भांडवल करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनाही यास अपवाद राहिले नाही. भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांनी आयोजिलेल्या बैठकीसाठी मुंबईत होते.

दुसरीकडे, प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून कुसुमाग्रज स्मरण, पुरस्कार सोहळा या व्यतिरिक्त पहाटे ‘कुसुमाग्रज पहाट’ या मैफलीचे आयोजन होते. शब्द आणि स्वरांची मुक्त उधळण पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात होत असताना मराठीचा आलाप आवळत साहित्यप्रेमी घरी परतत. मात्र यंदा या कार्यक्रमास दर्दीच्या अनुपस्थितीचा फटका बसल्याने प्रतिष्ठानने सावधगिरीचा उपाय म्हणून कुसुमाग्रज स्मरण यात्रेत सायंकाळच्या सत्रात ‘कुसुमाग्रज पहाट’चा समावेश केला असल्याचे प्रतिष्ठानचे मकरंद हिंगणे यांनी सांगितले. सकाळच्या कार्यक्रमाशी प्रतिष्ठानचा संबंध नसला तरी कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असताना कार्यकारी मंडळातील कोणीही प्रतिष्ठानमध्ये आले नाही. दरम्यान, या दोन्ही कार्यक्रमांची सद्य:स्थिती माहीत नसल्याने प्रतिष्ठानच्या आवारात पोहचलेल्या साहित्यप्रेमींना आल्या पावली परतावे लागले. या संधीचा फायदा मात्र हौशी नागरिकांनी घेत नवमाध्यमांवर मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छांचा डंका पिटल्यानंतर प्रतिष्ठानच्या आवारात जात खास ‘सेल्फी’सह अन्य छायाचित्रीकरण करत आपले कर्तव्य पार पडले. प्रतिष्ठानने अशा अभ्यांगतासाठी खास व्यवस्था केली. सायंकाळच्या जनस्थान पुरस्कार सोहळ्यासाठी येणारे मान्यवर प्रतिष्ठानला भेट देतील, यामुळे दुपारी उशिराने प्रतिष्ठानला विद्युत रोषणाई करण्यास सुरुवात झाली.

प्रतिष्ठानची अशीही कर्तव्यपूर्ती.. 

सकाळचा कार्यक्रम हा लोकप्रतिनिधींचा असला तरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहणे गरजेचे होते. पदाधिकाऱ्यांनी आजवर हा शिरस्ता कायम ठेवला, मात्र लोकप्रतिनिधींसोबत त्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे तेथील दोन कर्मचाऱ्यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत प्रतिष्ठानच्या वतीने औपचारिकता पूर्ण केली. दुपारी अडीच वाजता महापालिकेला जाग आल्यानंतर तेथील काही पदाधिकारी येथे डोकावून गेले.