गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार त्या ठिकाणीही परस्परांविरोधात पुन्हा शड्डू ठोकून नव्याने मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्राला लागून असणाऱ्या आदिवासी पट्टय़ासह गुजरातमधील मराठीबहुल मतदारसंघांवर त्यांची नजर आहे. एकेक मत महत्त्वाचे असल्याने प्रचारात मराठी जनांसह नात्यागोत्यांचाही आधार शोधला जात आहे. या स्पर्धेत काँग्रेसही मागे राहिलेली नाही.

भाजप आणि काँग्रेसने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारात विविध तंत्रांचा खुबीने वापर होताना दिसतो. प्रचारफेरी, जाहीर सभा, ‘रोड शो’, घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी या नेहमीच्या पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञान, समाजमाध्यमे आदींद्वारे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पंतप्रधानांच्या राज्यातील या निवडणुकीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने अवघे केंद्रीय मंत्रिमंडळ गुजरातमध्ये धाडले. केवळ मंत्रिमंडळच नव्हे, तर गुजरातलगतच्या राज्यातील खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे धावपळ करीत आहेत.

महाराष्ट्राचा विचार करता सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील वितुष्ट सर्वश्रुत आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्याची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मराठी भाषिकांची मोठी संख्या असणारे मतदारसंघ त्याकरिता निवडण्यात आले. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागांतून नोकरी-रोजगारानिमित्त गुजरातमध्ये स्थायिक झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांचे नातेगोते, रोटीबेटी व्यवहार महाराष्ट्रात होतात. यामुळे सेनेने गुजरातमधील प्रचाराची धुरा आधिक्याने खान्देशातील मंत्री, लोकप्रतिनिधींवर सोपविली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. सुरतलगतच्या लिंबायत आणि उदना या दोन मतदारसंघांतील प्रचाराची धुरा आपल्याकडे सोपविण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री भुसे यांनी सांगितले.

सीमावर्ती आदिवासी भागांत काँग्रेसचा प्रचार

सीमावर्ती भागातील आदिवासी पट्टय़ासह इतरही मतदारसंघांत भाजपने ही रणनीती ठेवली. गुजरातला लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले आहेत. नाशिक, नंदुरबार जिल्ह्य़ातील खासदारांचाही त्यात समावेश आहे. दिंडोरीचे खा. हरिश्चंद्र चव्हाण हे त्यापैकीच एक. सुरगाण्याहून गुजरातची सीमा दीड किलोमीटरवर आहे. गुजरातमधील आसपासच्या गावांची बाजारपेठ सुरगाणा आहे. दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील आदिवासी बांधवांमध्ये नातेसंबंध असून आपण गुजरातमधील धरमपूर, डांग, चिखली, कापर्डे, वघई-वासदा या आदिवासी पट्टय़ातील मतदारसंघांत गावोगावी प्रचार करीत असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. या स्पर्धेत काँग्रेसही मागे नाही. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी सोपवून गुजरातमध्ये प्रचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या सर्वाची भिस्त प्रामुख्याने मराठी भाषिक मतदार आणि नातेसंबंध यावर असल्याचे अधोरेखित होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार त्या ठिकाणीही परस्परांविरोधात प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. भाजप आणि काँग्रेसने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारात विविध तंत्रांचा खुबीने वापर होताना दिसतो.