स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांचा विश्वास

नाशिक : शहरात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन नक्कीच ऐतिहासिक होईल यात कुठलीच शंका नाही. नाशिककर म्हणून या अगोदरच आपण जबाबदारी स्वीकारली आहे. आता स्वागताध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी स्वीकारण्यास आपली तयार असून संमेलनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करण्यात आपण कुठलीही कमतरता राहू देणार नाही. सर्वांच्या सोबतीने हे मराठी साहित्य संमलेन उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले जाईल, असा विश्वास जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त के ला.

येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भुजबळ यांची निवड करण्यात आली. संमेलनाच्या आयोजकांनी भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचा यानिमित्ताने सन्मान के ला. यावेळी भुजबळ यांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी करण्यात आलेली निवड हा आपल्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव्य केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा

भरत आहे.

याचा एक नाशिककर म्हणून अतिशय आनंद आहे. नाशिकमध्ये होणारे हे साहित्य संमेलन नक्कीच ऐतिहासिक होईल यात कुठलीच शंका नाही, असे भुजबळ यांनी नमूद के ले. शहरात होणारे साहित्य संमेलन आणि संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड होणे, याविषयी अनेकांनी आपली प्रतिक्रि या व्यक्त के ली आहे.

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड होणे हा एक अत्यंत आनंददायी क्षण आहे. रटाळ वाटणाऱ्या शास्त्रीय संकल्पना रसाळ करून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या नारळीकर यांना साहित्यिक शास्त्रज्ञ म्हणावे की शास्त्रीय साहित्यिक म्हणावे असा संभ्रम होतो. विज्ञानवादाची कास धरणाऱ्या आजच्या पिढीला त्यांच्याच भाषेत बोलणाऱ्या आणि जुन्या नव्याची योग्य सांगड घालणाऱ्या अशाच अध्यक्षांची गरज होती.  ती नाशिक नगरीत पूर्ण होत आहे याचा दुहेरी आनंद आहे.

– सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)

मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात होत असलेल्या साहित्य संमेलनास डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिक लाभणे निश्चितच समर्पक आहे. करोनानंतरच्या जगात वैज्ञानिक क्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा आधोरेखित झालेच आहे. डॉ. नारळीकरांच्या रूपाने साहित्याच्या ललित रूपापासून वैज्ञानिकपर्यंत सर्व समावेशक संमेलन होईल यात शंका नाही.

-जयप्रकाश जातेगांवकर (आयोजक, लोकहितवादी मंडळ)