News Flash

‘नाशिक रन’मध्ये १५ हजार जणांचा सहभाग

गतवर्षीच्या तुलनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या काहीशी कमी झाली.

समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शनिवारी आयोजित नाशिक रनमध्ये कडाक्याच्या थंडीत १५ हजारांहून अधिक आबालवृद्धांनी सहभागी होत सामाजिक बांधीलकी अधोरेखित केली.

परंतु, गतवर्षीच्या तुलनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या काहीशी कमी झाली. पण, सहभागी झालेल्यांमध्ये चांगलाच उत्साह होता. टीडीएस इप्कॉस कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातील सुमारे चार लाखांची रक्कम देणगी स्वरूपात ट्रस्टला दिली.

सकाळच्या गारव्यात पिस्ता रंगाचा टी शर्ट परिधान केलेले बालके, युवा वर्ग, महिला व जेष्ठांनी महात्मा नगरचे मैदान फुलले.

नाशिकस्थित काही समविचारी उद्योगांनी एकत्र येत सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतूने नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. २००३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, नाशिक रनचे विश्वस्त व बॉश इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, बॉश इंडियाचे कार्यकारी संचालक अ‍ॅड्रीस वोल्फ, इप्कॉसचे व्यवस्थापकीय संचालक एन बालाकृष्णन, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आदी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कविता राऊत व क्रीडा मार्गदर्शक वीजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत ज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला. फुगे हवेत सोडून नाशिक रनचा शुभारंभ झाला. यावेळी कलाकारांनी नृत्य सादरीकरण केले.

सुरुवातीला विशेष मुले, नंतर शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले. रनचा मार्ग छोटय़ांसाठी अडीच किलोमीटर तर मोठय़ांसाठी साडेचार किलोमीटर होता. त्याचा समारोप महात्मानगरच्या मैदानावर करण्यात आला. रनमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांसाठी खास सोडत काढण्यात आली. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

सचिव अनिल दैठणकर यांनी आभार मानले. रनच्या यशस्वितेसाठी टीडीके इप्कॉस आणि बॉश कारखान्याच्या ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2017 12:57 am

Web Title: marathon in nashik 2
Next Stories
1 पतंगोत्सवाचा जल्लोश
2 मुलांच्या पत्राद्वारे ‘हेल्मेट’ जागृती
3 रिक्त पदांचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही फटका
Just Now!
X