शहरातील मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा खेळ खंडोबा नित्याचा झाला असतांना नियमांचे पालन करा अशा सातत्याने सूचना देणारे पोलिसच कसे नियमाचे उल्लघंन करतात याचा अनुभव नागरिकांनी मालेगाव रस्त्यावर घेतला. येथे एक रेनॉल्ट कार स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या रस्त्यात उभी केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली होती. ही कार कोणाची याचा शोधाशोध घेतला असता  तेव्हा ती कार एका ‘पोलीस दादा’ ची निघाल्याने पोलीसही भांबावले. परंतु, नियमानुसार पोलिसांनी त्यांच्याकडूनही दंड वसूल केल्याचे कर्तव्य बजावल्याचा सुखद अनुभवही नागरिकांनी यावेळी घेतला.

मालेगाव रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. नागरिक, वाहनचालक या कोंडीतून मार्ग काढताना मेटाकुटीस येतात. त्या दिवशी या नव्या कोऱ्या ‘रेनोल्ट’ कारने त्यात भर टाकली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया ही याच रस्त्यावर असल्याने बँकेत जाणारे ग्राहक, कर्मचारी आपले वाहने येथे मिळेत त्या ठिकाणी उभी करीत असतात. ही रेनोल्ट कारही बेकायदा उभी करण्यात आली होती. त्यामुळे सुमारे एक तासाहून अधिक काळ येथे वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि त्यातील प्रवाशांना बसला. ज्या गाडीमुळे वाहतूक कोंडी झाली ती गाडी स्टेट बँकेच्या नांदगाव शाखेत गेलेल्या  पोलीस दादा  ची निघाल्याने आपल्याच बांधवाने वाहतुकीची कोंडी केल्याने त्याच्यावर कारवाई करावी कशी, अशी कोंडी पोलिसांची काहीवेळ झाली. विशेष म्हणजे तेही वाहतूक पोलीसच. अखेर नियम तो नियम या तत्वानुसार २०० रूपये दंड पोलिसांनी वसूल केला. औरंगाबाद येथील वाहतूक शाखेत काम करतांना वाहतुकीचा नियम मोडला म्हणून वाहन चालकांकडून दंडाची पावती इतरांकडून वसूल करणाऱ्या गणेश कोरडे या पोलिसाला आज त्याच कारणाने दंड भरण्याची वेळ आली.

दरम्यान, मालेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा हा नित्याचाच झालेला आहे.  याबाबत रस्त्यावर गाडी थांबविणाऱ्या चालक व मालकांवर कारवाईचा बडगा उगारला असता स्थानिक नेते मंडळीं लागलीच भ्रमणध्वनीवरून पोलिसांवर दबाव आणत असल्याची व्यथा पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी  मांडली. शहर व परिसरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत आहे. वाहतुकीच्या या गंभीर समस्येवर कायमचा तोडगा काढून हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.