News Flash

दिवाळी बाजारपेठेवर ‘मेक इन इंडिया’ची छाप

रात्रीच्या झगमगाटात दीपोत्सवाच्या माळीसह रंगीत मातीच्या सजावट केलेल्या पणत्या लक्ष वेधून घेतात

दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक शहरातील बाजारपेठेत विविध स्वरूपातील आकर्षक दिवे दाखल झाले आहेत.

तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या दीपोत्सवाचे स्वागत करण्यासाठी बाजारात प्लास्टिक, कागद, कापडी आणि माती याचे विविध रंगसंगती आणि आकारातील आकाश दिवे दाखल झाले

आहेत. रात्रीच्या झगमगाटात दीपोत्सवाच्या माळीसह रंगीत मातीच्या सजावट केलेल्या पणत्या लक्ष वेधून घेतात. यंदा बाजारपेठेवर ‘मेक इन इंडिया’ची छाप असून चायनीज दीपमाळ, आकाशकंदील बाजारपेठेतून हद्दपार झाल्याचा विक्रेत्यांचा दावा आहे.

अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या दीपोत्सवाचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून त्यासाठी लागणारे आकाश दिवे, रंगीत विद्युत माळी, दीपमाळ यासह अन्य पर्याय ग्राहकांसमोर आहेत. पारंपरिक चांदणी आकाश कंदीलची जागा आता कापडी तसेच कागदी स्वरूपातील डमरू, घुमट आकारांनी घेतली असून बहुतांश ठिकाणी मनोरा पद्धतीत असलेल्या आकाश कंदिलाला पसंती दिली जात आहे. मात्र षट्कोनी आकारातील आकाश कंदिलांना ग्राहकांकडून विशेष मागणी आहे. विशेषत घर तसेच दुकान सजावटीसाठी लहान आकारातील या आकाश कंदीलला पसंती दिली जाते. मागील वर्षांच्या तुलनेत आकाश दिव्याचे दर काही अंशी वाढले असले तरी त्याचा विक्रीवर परिणाम झाल्याचे जाणवत नाही.

यंदा बाजारात हॅण्डमेड कागदापासून तयार केलेले पारदर्शी आकाश कंदील दाखल झाले आहेत. लाल, पिवळा, गुलाबी, पिस्ता, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगातील हॅण्डमेड कागदाला सजावटीसाठी लावलेली सोनेरी व अन्य रंगातील किनार, स्वस्तिक, दीपक या चिन्हांनी ते अधिकच उठावदार दिसतात. पर्यावरणस्नेही दिवाळी साजरा करणाऱ्यांची या कंदिलाला विशेष मागणी आहे. मात्र यासाठी किमान २०० रुपये मोजण्याची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे. तसेच, टेराकोटा मातीचा वापर करत झुंबर, नारळ, पणती, आकाश कंदील असे विविध आकार उपलब्ध आहेत. दीपोत्सवानंतर या दिव्यांचा वापर गृहसजावटीसाठी होऊ शकतो.

या शिवाय तुळशी वृंदावन, स्वस्तिक, नारळ, वेगवेगळ्या पाना-फुलांच्या आकारातील मातीचे साधे दिवे प्रति नग ५ रुपयांपासून आहेत. याच दिव्यांना आकर्षक रंगरंगोटी आणि नक्षीकाम केल्यानंतर त्यांची किंमत २०-२५ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर लक्षात येते. मात्र मातीच्या दिव्यामुळे होणारी तेलाची गळती पाहता काहींनी सेलवर चालणाऱ्या दिव्यांना प्राधान्य दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 4:15 am

Web Title: mark in india impact in diwali market
Next Stories
1 नाशिक विभागातून भेसळयुक्त ३५ हजार किलो साठा जप्त
2 शिक्षणाची नैतिक मूल्य जोपासा
3 राज्यपाल येती घरा..
Just Now!
X