कोटय़वधींची उलाढाल, धान्याची वाहतूक ठप्प

नाशिक : माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये जिल्ह्यतील सर्व बाजार समित्यांसह शासकीय गोदाम, नाशिक रोड मालधक्का आणि विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगार सहभागी झाल्यामुळे उपरोक्त ठिकाणचे कामकाज आणि बाजार समित्यांमधील कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले. तर रेल्वे, गोदामातून अन्नधान्याची वाहतूक थांबली.

माथाडी कामगारांच्या मागण्यांची अनेक वर्षांपासून सोडवणूक करण्यासंबंधी माथाडी, वाहतूक आणि जनरल कामगार संघटनेने वारंवार निवेदने दिली. मंत्रालयात बैठक होऊन निर्णय झाले. परंतु त्यांची अंमलबजावणी करण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला. माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न शासकीय माध्यमातून होत आहे. कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लाक्षणिक बंद पुकारणे भाग पडल्याकडे लक्ष वेधण्यात आले. करोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक साहाय्य, कांदा-बटाटय़ाचे नियमन कायम करणे, माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना, या समितीवर संघटनेच्या कामगार नेत्यांची नेमणूक, नाशिक जिल्ह्यतील बाजार समितीतील माथाडी कामगारांच्या लेव्ही प्रश्नाची सोडवणूक, विविध माथाडी मंडळांतील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य, माथाडी कामगारांना हक्काची कामे मिळण्याकरिता पोलीस संरक्षण मिळण्याची कायद्यात तरतूद करणे, आदी मागण्यांचे निवेदन माथाडी संघटनेचे नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव, कृष्णराव जगदाळे यांनी प्रशासनास दिले. कामगारांच्या बंदमुळे बाजार समित्यांची कोटय़वधींची उलाढाल पूर्णपणे  थांबली होती.