पुस्तकाद्वारे पालकांचे प्रबोधन

नव्या शैक्षणिक वर्षांत दरवर्षी शालेय व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला तोंड देताना पालकांची दमछाक होत असल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने छाया देव लिखीत ‘पालकांचे हक्क व जबाबदाऱ्या’ या पुस्तकाद्वारे पालकांमध्ये त्यांच्या हक्का विषयी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आहे. पुस्तकात आपल्या अडचणी, प्रश्नांचा पाठपुरावा कसा करता येईल या विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

शालेय व्यवस्थापनाच्या नियमबाह्य कारभाराविरोधात लढा देण्याचे काम शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या प्रश्नावर पालकांना सजग करण्यासाठी मंचने या पुस्तिकेची निर्मिती केली. मंचच्या उपाध्यक्षा देव यांनी दहा वर्षांत काम करताना पालकांमध्ये जाणवलेले अज्ञान व भीती दूर करण्यासाठी तिचे लेखन केले आहे. पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत खासगी शाळा पालकांचे हक्क डावलून त्यांचे आर्थिक शोषण व मानसिक खच्चीकरण करत आहेत. या विरोधात आवाज उठवत पालकांचे विशेषत ग्रामीण भागातील पालकांचे प्रबोधन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या मध्ये मुलांचे शिक्षण, शिक्षणासाठी निवडण्यात येणारे माध्यम, आपल्या आर्थिक क्षमता, सभोवतालची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन शाळा कशी निवडावी, पालकांचे हक्क काय यामध्ये शाळांना माहितीची अधिकार लागू होतो, शाळेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे आहे का, आयुक्तांच्या कार्यालयातून संस्था व शाळेने हिशेबाद्वारे केलेल्या गैरकृत्याची माहिती मिळवत शाळेविरूध्द कारवाई करण्यासाठी अर्ज, देणगी देण्यात येऊ नये, शाळेने विद्यार्थ्यांवर वर्षभरात काय खर्च केला याचा तपशील देणे शाळेला बंधनकारक, शालेय साहित्य खरेदी विशिष्ट दूकानातून करा असा आग्रह शाळा करू शकत नाही आदी विषयांद्वारे पालकांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

शालेय व्यवस्थापन आणि पालक संघाची भूमिका, शाळेच्या समस्येविषयी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच मार्गदर्शन कसे करेल, त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे कसा पाठपुरावा करता येईल आदी विषयांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचचे श्रीधर देशपांडे यांनी पालकांनी आपले हक्क व जबाबदाऱ्या जाणून घेतल्यास ते नफेखोर खासगी शाळांविरोधात संघर्ष करू शकतील. देव यांनी ही पुस्तिका पालकांच्या शोषणास खीळ बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली. पुस्तिका मिळवण्यासाठी छाया देव (९४२०७ ८४६४८), सचिन मालेगावकर (९९२२२ १२०९९) आणि अशोक राबडे (७७९८२ ४६५३६) यांच्याशी संपर्क साधावा.

‘अशोका’ शाळेच्या पालकांचा आज मोर्चा

नाशिक येथील अशोका युनिव्हर्सल स्कुलने शैक्षणिक शुल्कात एका वर्षांत ९३ टक्के वाढ केली आहे. वर्षांकाठी दोन महिन्यांचे शैक्षणिक शुल्क, सत्र शुल्क म्हणून घेण्याऐवजी तब्बल सहा ते सात महिन्यांचे शैक्षणिक  शुल्क टर्म फी म्हणून वसूल केले. शाळेमधील पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीचे कामकाज नियमाप्रमाणे व पारदर्शक होत नाही. या विरोधात शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयावर शुल्क वाढीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारक येथे सकाळी ९.३० वाजता पालकांनी जमायचे आहे. शाळेकडून कागदपत्रे, शुल्कवाढीचे प्रस्ताव, लेखापरीक्षण झालेले हिशोब आदी कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नाही. शालेय साहित्य व गणवेश खरेदीची सक्ती केली जाते. या बाबत शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले गेले होते. मात्र शिक्षण विभाग कारवाई करत नसल्याचा निषेध मोर्चाद्वारे केला जाणार आहे.