करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी शहरात नागरिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्य़ात आतापर्यंत एकूण सात करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील सहा रुग्ण ग्रामीण तर एक रुग्ण शहरातील आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबद्दल महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन वारंवार मार्गदर्शन करीत आहे.

करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. दाट वस्ती आणि सार्वजनिक ठिकाणी करोना विषाणूचा प्रसार वेगाने होऊ शकतो. करोनासदृश्य रुग्णांची संख्याही वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून विषाणूला अटकाव व्हावा यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. शहरात नागरीकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

तसेच हे मास्क नामांकीत कंपनी अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले असावेत. योग्य पध्दतीने स्वच्छ, र्निजतूक करून पुन्हा वापरता येतील असे असावेत, असे शहर पोलिसांनी म्हटले आहे.