01 March 2021

News Flash

मातंग समाजाचा मोर्चा

शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक येथे मातंग समाज क्रांतीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा शिवाजी रस्त्यावर थांबविण्यात आला.

मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची शासन स्तरावर चौकशी व्हावी तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. समाजावर जातीयवादी धनदांडग्या समाजकंटकांकडून होणाऱ्या अत्याचाराची शासन स्तरावर चौकशी करण्यात यावी, मातंग समाज आणि तत्सम जातींवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व मंजूर शिफारसींची तत्काळ अंमलबजावणी करावी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज प्रकरण त्वरित मिळावे, अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजाचाही समावेश करावा, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नने गौरवावे, मातंग आणि मांग-गारुडी समाज यांच्यातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांची जणगणना करून दोन्ही समाजाला पिवळी शिधापत्रिका देण्यात यावी, वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी त्वरित निधी द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. नियोजित वेळेपेक्षा दोन तासांहून अधिक उशिरा सुरू झालेला मोर्चा इदगाह मैदानापासून शालिमारमार्गे शिवाजी रस्त्यावरील आंबेडकर पुतळ्याजवळ थांबला. मोर्चामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी राजू वैरागकर, संतोष आहिरे, यु. के. आहिरे, सचिन नेटारे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 2:44 am

Web Title: matang society protest
Next Stories
1 लोकसहभागातून ५५ हजार वृक्षांची लागवड
2 तुकाराम मुंढे समर्थक-विरोधकांमध्ये समाजमाध्यमांत रणधुमाळी
3 दुसऱ्या तुकारामाची गाथा!
Just Now!
X