10 July 2020

News Flash

माथाडी कामगारांच्या संपामुळे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प

कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अनेकदा बैठका झाल्या.

बाजार समित्यांमध्ये कृषिमालाचे लिलाव बंद

नाशिक : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी बुधवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्य़ातील सर्वच बाजार समित्यांमधील कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले. शासकीय गोदाम, मालधक्का आदी ठिकाणी धान्य वितरण, चढ-उताराचे काम झाले नाही. कांदा, बटाटय़ाचे कुठेही लिलाव झाले नाही.

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, पुनर्रचित माथाडी मंडळावर संघटनेच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका, विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य, माथाडी मंडळात पूर्णवेळ अध्यक्ष, सरचिटणीस यांची नेमणूक, नाशिकमधील माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक, रेल्वे यार्डात कामगारांसाठी सुविधा या प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी, वाहतूकदार आणि जनरल कामगार संघटनेने लाक्षणिक संपाची हाक दिली होती.

कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अनेकदा बैठका झाल्या. त्यावेळी निर्णय होऊनही शासकीय अधिकारी ती परिपत्रके प्रसिध्द करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संघटनेने केला. असंरक्षित कामगारांसाठी तयार केलेला माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न शासकीय माध्यमातून होत आहे. कामगारांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हा चिटणीस सुनील यादव यांनी दिला. संपामुळे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच बाजार समित्यांतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्य़ात बाजार समिती, रेल्वे माल धक्का, शासकीय गोदामात सुमारे पाच हजार माथाडी कामगार आहेत. सर्व जण संपावर गेल्याने उपरोक्त ठिकाणी कोणतेही काम झाले नसल्याचे यादव यांनी सांगितले.

लासलगाव, पिंपळगाव, मनमाड, येवला आदी १५ बाजार समित्यांमध्ये मुख्यत्वे कांद्याचे लिलाव होतात. एकटय़ा लासलगाव बाजार समितीत दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. संपामुळे बाजार समित्यांमधील कोटय़वधी रुपयांचे व्यवहार झाले नाही. आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसला. धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत झाली. रेल्वे धक्का, शासकीय गोदामात धान्य ने-आण झाली नाही. कृषिमाल लिलावात माथाडी कामगार तोलाईचे काम करतात. या महत्वाच्या कामास कामगार नसल्याने लासलगाव बाजार समितीत कोणतेही व्यवहार झाले नसल्याचे सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:39 am

Web Title: mathadi worker stop work strike transaction jam akp 94
Next Stories
1 ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम तक्रारदारास परत
2 पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे
3 विनाकरवाढ विकासकामे
Just Now!
X