17 September 2019

News Flash

उखाणे आणि ‘होम मिनिस्टर’मध्ये ‘माऊली संवाद’ हरवला!

स्थानिक समस्या मांडताच आल्या नसल्याची महिलांची तक्रार

शिवसेनेच्या ‘माऊली संवाद’ कार्यक्रमाप्रसंगी आदेश बांदेकर यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली (छाया- यतीश भानू)

शिवसेनेच्या वतीने तळागाळातील महिलांना बोलतं करण्यासाठी ‘गप्पा मनातल्या, शेतातल्या, गावातल्या’ माऊली संवाद यात्रा सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. या अंतर्गत शुक्रवारी येथील माऊली लॉन्स परिसरात ‘माऊली संवाद’ झाला. परंतु, उखाणे आणि ‘होम मिनिस्टर’मध्ये संवाद हरवून गेला. कार्यक्रमात स्थानिक समस्या, सामाजिक प्रश्न यापेक्षा आदेश भाऊजींचं गारूड आणि स्थानिक नगरसेवकांचा बोलबाला दिसून आल्याने स्थानिक समस्यांविषयी बोलताच आले नसल्याची तक्रार काही महिलांनी केली.

आदेश बांदेकर होम मिनिस्टरमुळे घरोघरी पोहचले आहेत. त्यामुळेच ‘माऊली संवाद’ हा कार्यक्रम पैठणीच्या खेळासारखाच काही असेल अशा संभ्रमात अनेक महिला होत्या. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी प्रारंभीच प्रशासन आणि तुम्ही यांच्यात दुवा म्हणून आपण आलो असून तुमचे प्रश्न निर्भयपणे मांडा, असे आवाहन केले. त्यानंतर अनेक महिलांचे हात वर झाले. परंतु, बहुतांश महिलांनी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे गुणगान गायले. तुमच्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी व्हायचे आहे.. मला उखाणा घ्यायचा आहे.. तुम्ही पैठणी आणाल असे वाटले होते, अशा संवादाने कार्यक्रमाचा सूर हरवत गेला.  बहुतांश महिलांनी स्थानिक नगरसेवक आपल्या प्रभागात किती छान काम करतात, प्रभागात सर्व सुविधा कशा उपलब्ध आहेत, त्यांच्यामुळे तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली, अशी स्तुती सुरू केल्यावर बांदेकर यांनी ‘सर्व तुमचीच माणसे बोलावली की काय’ असा टोला नगरसेवकांना लगावला. काही महिलांनी सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, प्रभागातील खुले रोहित्र आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे निर्माण झालेला धोका, उंटवाडी ते डीजीपी नगर परिसरातील निकृष्ट रस्ता, ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्ती वेतन वाढवून देण्याची गरज, शिक्षणासाठी ‘डोनेशन’च्या नावाने होणारा अवास्तव खर्च, विद्यार्थी सुरक्षा आदी विषयांकडे लक्ष वेधले. या प्रश्नांच्या सोडवणुकीची जबाबदारी तेथील शिवसेनेच्या नगरसेवकांवर सोपवीत हे प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविले जातील, असे आश्वासन बांदेकर यांनी दिले.

तुम्ही सभासद होणार का?

आदेश बांदेकर यांची छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी महिलांनी भ्रमणध्वनी बाहेर काढल्यावर पक्ष नोंदणीत तुमच्यापैकी किती महिला सहभागी होणार? शिवसेनेचे धनुष्य किती जणी हाती घेणार, असे प्रश्न बांदेकर यांनी उपस्थित केले. महिलांचे हात वर होताच यांच्याकडून तातडीने पक्षाचे सभासद अर्ज भरून घ्या, या आपल्या अग्रदूत आहेत, असे बांदेकर यांनी सांगितले.

सिद्धिविनायक न्यासचा पुढाकार

माऊली संवादात बालभिक्षेकऱ्यांच्या शिक्षणाविषयी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक न्यासने पुढाकार घेतला असल्याचे बांदेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. त्यांच्या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ‘के.जी. टू पी.जी.’ शिक्षणाची जबाबदारी न्यासने उचलली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

First Published on August 24, 2019 12:46 am

Web Title: mauli samvad adesh bandekar shiv sena abn 97