थंडीने प्रदीर्घ काळ ठोकलेला मुक्काम आणि अधूनमधून झालेला बेमोसमी पावसाचा शिडकावा अनुभवल्यानंतर नाशिकची पावले आता उन्हाळ्याकडे पडू लागली आहेत. थंडी अंतर्धान पावली असून कमाल तापमानाची पातळी जवळपास ३५ अंशांवर पोहोचली आहे. सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणविण्यास सुरुवात होते. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या तापमानाने फेब्रुवारीच्या अखेरीस हा टप्पा गाठल्याने या वर्षी उन्हाळा चांगलाच टळटळीत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून बदल होत असल्याचा अनुभव आहे. पावसाळा, हिवाळा हे मागील दोन्ही हंगाम पोषक ठरले होते. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे हा परिसर अनेक दिवस थंडीच्या लाटेत सापडला होता. फेब्रुवारीदरम्यान गारवा हळूहळू ओसरला आणि त्याची जागा उकाडय़ाने घेतली.

फेब्रुवारीत तापमानात बरेच चढ-उतार आले. एक फेब्रुवारीला ९.४ अंशांवर असणारे किमान तापमान नंतर दोन वेळा १५ अंशावर गेले होते. आता किमान तापमानाने १६.५ अंशांचा टप्पा गाठला असून कमाल तापमान ३४.३ वर पोहोचले आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस ही स्थिती आहे. मालेगावसह आसपासच्या परिसरात वातावरण अधिक तापल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या नाशिकमध्ये आता सकाळी ११ वाजेनंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी चटके बसू लागले आहेत. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे विविध कंपन्यांनी विविध साधने बाजारात आणली आहेत. महागडय़ा वातानुकूलित यंत्रणा खरेदीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.

गेल्या काही दिवसात वातानुकूलित यंत्र, पंखे, थंडगार पाण्यासाठी माठ, खिडक्यांना पडद्याप्रमाणे बसविल्या जाणाऱ्या वाळा तत्सम साधनांच्या मागणीत वाढ झाल्याचे लक्षात येते. प्रमुख चौकांत शीतपेय, आइसक्रीम पार्लर, रसवंती अशी दुकाने सुरू झाली आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत टळटळीत उन्हाची अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली. स्पर्धा बघणाऱ्यांना उन्हापासून बचाव करणे क्रमप्राप्त ठरले.

तापमान फलकाची ‘शोभा’

शहरवासीयांना तापमानाची माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागाने सीबीएस चौकालगत लावलेल्या फलकाची शोभा होत असल्याचे दृष्टिपथास पडते. हा फलक अद्ययावत करण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही. परिणामी, सध्या या फलकावर २० फेब्रुवारीचे तापमान झळकत आहे. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असताना फलकावरील तापमानाची पातळी पाहून नागरिक बुचकळ्यात पडतात.