मुंढेंच्या बदलीनंतर ‘महापौर आपल्या प्रभागात’ उपक्रम बंद; दोन महिन्यांपासून नागरिकांना प्रतिक्षा

नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ला शह देण्यासाठी वाजतगाजत सुरू केलेला ‘महापौर आपल्या प्रभागात’उपक्रम दोन महिन्यांपासून बंद आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभी महापौर रंजना भानसी यांनी नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २७ मध्ये भेट दिली होती. नंतर आजपर्यंत एकाही प्रभागात त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता दौरा केलेला नाही. मुंढे यांची बदली झाल्यानंतर महापौरांनी आपला उपक्रम गुंडाळला की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

तत्कालीन पालिका आयुक्त मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे महत्त्व कमी होत असल्याच्या धास्तीतून भाजपने ‘महापौर आपल्या प्रभागात’ उपक्रमाची संकल्पना मांडली. तुकाराम मुंढे यांच्या नियमाधारीत कामामुळे त्रस्तावलेल्या भाजपने प्रशासनाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढण्यासाठी या उपक्रमाचा अधिक्याने वापर केला.

एकाचवेळी वेगवेगळ्या उपक्रमातून का होईना महापौर आणि आयुक्त स्वतंत्रपणे तक्रारी, गाऱ्हाणे ऐकत असल्याने नागरिक सुखावले होते. मुंढे यांच्या उपक्रमात प्रशासनातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी सहभागी होत. कोणतीही तक्रार झाल्यास तिचा तातडीने निपटारा केला जाई.

महापौरांच्या उपक्रमात पालिकेतील काही अधिकारी आणि त्या त्या विभागातील अधिकारी सहभागी होत. स्थानिक नगरसेवकांच्या सोबतीने महापौर रंजना भानसी यांनी नाशिकरोड, सातपूर, नवीन नाशिक विभागातील काही प्रभागांची पाहणी केली. पालिकेच्या शाळा, रुग्णालयांची दुरवस्था अनुभवली. प्रभागनिहाय दृष्टिपथास पडणाऱ्या समस्या, नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांच्याकडून दिले जात असत

महापौर कोणत्या प्रभागात दौरा करणार याची माहिती आधीच जाहीर केली जात होती. महापौर कोणत्या भागात जाणार हे समजल्यानंतर पालिकेचे अधिकारी ठळकपणे दृष्टिपथास पडणारा कचरा साफ करण्याच्या कामाला लागतात. वॉक विथ कमिशनर उपक्रमावेळी यापेक्षा वेगळे काही घडत नव्हते. एकदा हा उपक्रम पार पडला की, पालिकेचे अधिकारी-कर्मचारी स्वच्छतेच्या कामाकडे ढुंकूनही बघत नाही. सदस्यांनी कथन केलेले अनुभव ऐकून महापौरांनी पूर्वसूचना न देता अकस्मात कोणत्याही प्रभागात जाण्याचे जाहीर केले होते. यामुळे कोणत्याही भागात महापौर पूर्वसूचना न देताच धडकतील अशी सर्वाना धास्ती होती. परंतु, तसे दोन महिन्यात घडले नाही. पालिका आयुक्त पदावरून मुंढे यांची बदली झाल्यामुळे ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम बंद होणे स्वाभाविक होते. तीच स्थिती महापौर आपल्या प्रभागातची झाली आहे.

प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी खुद्द महापौर येत असल्याचा नागरिकांना कोण आनंद होता. परंतु, तो अधिक काळ टिकला नाही. महापौरांचे प्रभागनिहाय दौरे थांबल्याने हा उपक्रम केवळ मुंढे आणि प्रशासनावर टीकास्त्र सोडण्यासाठी होता की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील अनेक समस्या, प्रश्न आजही जैसे थे आहेत. त्या जाणून घेणे, सोडवणूक करणे यासाठी कोणी नसल्याची भावना बळावली आहे.

उपक्रमाचे नव्याने नियोजन

महापौर आपल्या प्रभागात हा उपक्रम बंद करण्यात आलेला नाही. शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तो राबविला जातो. नव्याने नियोजन करून लवकरच हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

-रंजना भानसी (महापौर)