तीन महिन्यांची मुदतवाढ

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते यांना लाभ होणार आहे. महापौरांचा कार्यकाळ १५ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत होता. आता त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक विधानसभा निवडणुकीनंतरच होईल. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १५ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्या दिवशी नवीन महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. त्यानुसार भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती; परंतु नव्या निर्णयामुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी पडले आहे. या निर्णयामुळे महापौर, उपमहापौरांना आणखी तीन महिने त्याच पदावर राहण्याची संधी मिळणार आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता हस्तगत केली होती. पक्षाचे ६६ नगरसेवक निवडून आले. सर्वाचे समाधान करण्यासाठी पक्षाने महापौर पदासाठी एक वर्षांची कालमर्यादा निश्चित केली होती. त्यानुसार पाच ज्येष्ठ नगरसेवकांना या पदावर संधी देण्याचे नियोजन होते; परंतु भाजपमधील अंतर्गत कलह इतका वाढला की, नंतर हा विषय मागे पडला. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात सत्ताधारी भाजपच्या मनमानी कारभाराला चाप लावला गेला. यामुळे कोणतीही विकासकामे करता आली नसल्याची भाजप नगरसेवकांची भावना झाली.

महापौर आणि तत्कालीन आयुक्त यांच्यात मतभेदाचे अनेक प्रसंग घडले. पदाधिकाऱ्यांची वेगळी स्थिती नव्हती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना तो कठीण काळ वाटला. वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करून अखेर मुंढे यांची बदली केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचा ताजा इतिहास आहे.