|| अनिकेत साठे

नाशिकमध्ये नव्या समीकरणांमुळे राजकारण रंगले; छोटय़ा पक्षांना महत्त्व :- महापालिकेच्या राजकारणात सत्ता काबीज करणाऱ्या राजकीय पक्षाला नंतरची अडीच वर्षे ती राखताना नानाविध कसरती कराव्या लागतात, तडजोडींचा मार्ग पत्करावा लागतो. महापालिकेत बहुमत मिळवणाऱ्या भाजपवर देखील ती वेळ आली आहे. आठ नगरसेवक फुटण्याच्या मार्गावर असल्याने भाजप मनसे, अपक्षांची मनधरणी करीत आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेना महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला धक्का देण्यासाठी प्रयत्नशील आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे बोटावर मोजता येतील इतके संख्याबळ असणाऱ्या मनसे, अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेच्या गडाला भाजपने सुरुंग लावला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरास दत्तक देण्याची साद घातली. त्यास शहरवासीयांनी भाजपला बहुमत देऊन प्रतिसाद दिला. काही कुरबुरी वगळता भाजपची सुरुवातीची अडीच वर्षे सुखेनैव गेली. विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघ राखण्यात यश मिळाले. तथापि, बदलत्या राजकीय परिस्थितीत पालिकेतील सत्ता राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. शुक्रवारी महापौरपदाची निवडणूक होत आहे. तत्पूर्वीच आठ नगरसेवक हे सेनावासी झालेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक मानले जातात. फोडाफोडीच्या खेळीमुळे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या नगरसेवकांना कोकणमार्गे गोव्यात सुरक्षितस्थळी नेले. महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. यामुळे इच्छुकांची वाढलेली संख्या भाजपची डोकेदुखी ठरली आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत कोणत्याही एका नावावर मतैक्य झाले नाही. अखेरीस पक्षाच्या निर्देशानुसार तिघांनी अर्ज भरले. आता ऐनवेळी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.

विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी डावलल्याने बाळासाहेब सानप हे भाजपच्या महापालिकेतील सत्ता केंद्राला हादरा देण्यासाठी सरसावले आहेत. भाजपच्या आठ नगरसेवकांनी बंडाचे फडकविलेले निशाण ही त्यांची खेळी आहे. राज्यातील सूत्र वापरून भाजपला धक्का देण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

आकडेवारीचा खेळ : महापालिकेत महापौरपदासाठी कोणत्याही पक्षाला ६१ चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. स्पष्ट बहुमत असूनही आठ नगरसेवक दुरावल्याने भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी झगडावे लागत आहे. हे नगरसेवक फुटल्याचे गृहीत धरून भाजप तयारी करीत आहे. भाजपचे ६५ वर असणारे संख्याबळ सानप समर्थक नगरसेवक फुटल्यास ५७ वर येऊ शकते. महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवार निश्चितीनंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची धास्ती आहे. घटणारे संख्याबळ मनसे, अपक्षांच्या सहकार्यातून भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष असे विरोधकांचे संख्याबळ ५४ पर्यंत जाते. सेना विरोधकांची महाआघाडी करून भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीत संभाव्य फुटीर सदस्य गैरहजर राहिल्यास कमी होणारा जादुई आकडा गाठता येईल, असा सेनेचा अंदाज आहे. मनसेचे इंजिन कोणत्या पक्षाचे सारथ्य करणार ते गुलदस्त्यात आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे पाच सदस्य असणाऱ्या मनसेच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.