पालिका प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे

पालिका शाळांची दुरवस्था, डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष, दवाखान्यांची बिकट स्थिती, प्रशासनाकडून नगरसेवकांना मिळणारी वागणूक, छोटय़ा-मोठय़ा कामांमध्ये होणारी आडकाठी अशा तक्रारींचा पाऊस सर्वसाधारण सभेत पडल्याने संतप्त झालेल्या महापौर रंजना भानसी यांनी दुर्गेचे रूप धारण केल्याचे सर्वसाधारण सभेत पाहावयास मिळाले. यावेळी प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले

महापौर भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेली सर्वसाधारण सभा वेगवेगळ्या कारणांनी वादळी ठरली. शिवसेनेने आरोग्याच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती. शिवसेनेचे नगरसेवक साथीच्या आजारांमुळे निर्माण झालेल्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी खास निषेधात्मक संदेश लिहिलेल्या टोपी परिधान करून आले. तर मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात पूर्णवेळ मुखवटा धारण केला.

काही दिवसांपासून सेनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या रुग्णालयात भेटी देऊन तेथील स्थिती जाणून घेत आहेत. पालिकेच्या रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचे महापौरांच्या पाहणी दौऱ्यातही उघड झाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी रुग्णालयांची स्थिती कथन केली. सदस्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. रुग्णालयात औषधसाठा, डॉक्टरांचा अभाव, अस्वच्छता त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छता, धूर फवारणीची कामे होत नसल्याने डासांचे प्रमाणात परिणामी उद्भवलेले साथीच्या आजार आदींवरून काहींनी प्रशासनाला जबाबदार धरले. भाजपच्या नगरसेविका प्रियांका माने यांच्या सासऱ्यांचे साथीच्या आजाराने निधन झाले. या प्रकरणात उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून महापौरांनी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी जे. झेड. कोठारी यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा मुद्दा मांडला गेला.

या संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपरोक्त प्रकरणात एका वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे सांगून डॉ. कोठारी यांची चौकशी सुरू असून तोवर त्यांची बदली करण्यात आल्याचे नमूद केले. स्वाइन फ्लूसह इतर साथीचे आजार बळावत असताना पुरेशी जनजागृती झाली नसल्याच्या तक्रारी केल्या गेल्या. सभागृहात चर्चा सुरू असताना प्रशासनाच्या कार्यपतद्धतीच्या निषेधार्थ प्रियंका माने यांनी सभात्याग केला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

महापौरांनी प्रशासनावर अंकुश ठेवायला हवा, असा आग्रह अनेकांनी धरला. या घटनाक्रमाने महापौरही संतप्त झाल्या. नगरसेवक समस्या मांडतात. पालिकेचे अधिकारी त्या सोडविण्याची तसदी घेत नाही. त्यांचा सन्मान राखत नाही. छोटी-मोठी कामे करण्यास प्रशासन आडकाठी करते, असा आक्षेप घेत महापौरांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक निधीतून कामे सुचविले गेली. पण, तीदेखील केली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौरांचा संताप पाहून सभागृह अवाक् झाले. प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढल्याबद्दल विरोधकांनी त्यांचे अभिनंदन केले. या घटनेने पालिकेतील सत्ताधारी विरुध्द आयुक्त यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे पाहावयास मिळत आहे.

.. तर अधिकाऱ्यांवर कारवाई

पालिका प्रशासनाने याच पद्धतीने काम सुरू ठेवले तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा महापौर भानसी यांनी दिला. नगरसेवक, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना जे अधिकारी कुचराई करतील, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.