शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक उंचावत असताना आणि सराईत गुन्हेगार अक्षरश: धुडगूस घालत असताना गेल्या पाच महिन्यात २४ पैकी सात खूनाच्या घटना ज्या पंचवटी परिसरात घडल्या, तेथील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी मौन बाळगून असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातही नाशिक नगरीचे महापौरपद सांभाळणारे अशोक मुर्तडक यांचा प्रभाग अशा घटनांनी अधिकच चर्चेत आला आहे. कधीकाळी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या महापौरांनी या संदर्भात आजपर्यंत गप्प बसणे पसंत केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, पालकमंत्र्यांनी आयुक्तांना इशारा दिल्यावर आता महापौरही कार्यरत झाले आहेत. महापालिका, मनसे, नागरिक आणि पोलिसांच्या सहकार्याने लवकरच ‘भयमुक्त नाशिक’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुर्तडक यांनी दिली आहे.
चार दिवसांपूर्वी पंचवटीतील हनुमानवाडी चौकात ‘मोक्का’तील गुन्हेगारी टोळक्याने एकाचा खून तर एकावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणातील संशयित कुंदन परदेशी, किरण परदेशी, अभय इंगळे, कालेकर, अन्मी वाळके यांच्यातील काहींवर दोन वर्षांपूर्वी मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. अलीकडेच त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. या सुटकेनंतर संशयितांनी रामनवमीच्या दिवशी शुभेच्छा देणारे फलकही परिसरात झळकावले होते. त्यावर संशयितांसमवेत सेना-राष्ट्रवादी व सध्या भाजपवासी झालेल्या एका वजनदार पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या छायाचित्राचाही समावेश असल्याचे स्थानिक सांगतात. गुन्हेगारीला राजाश्रय लाभल्याने ती फोफावल्याची असंख्य उदाहरणे आहेत. तडिपार गुन्हेगाराला संपर्क कार्यालयात आश्रय देणारा नगरसेवक पवन पवार असो की, दुहेरी खूनातील संशयितांना मद्य पुरविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला रिपाइं नगरसेवक प्रकाश लोंढे असो. याआधी गुन्हेगारांचे राजकीय लागेबांधे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे समोर आले आहेत.
गेल्या काही वर्षांत विविध भागात अनेक टोळ्या उदयास आल्या असून त्यांच्यातील अंतर्गत वाद विवादांची झळ नागरिकांना सहन करावी लागत आहे. पंचवटीतील फुलेनगर, एरंडवाडी, हिरावाडी, मोरे मळा हा परिसर कायम चर्चेत असतो. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस झोपडपट्टी व संवेदनशील परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवतात. मात्र त्यात सराईत वा अट्टल गुन्हेगार सापडल्याची उदाहरणे फारच कमी आहेत. सराईत गुन्हेगारांना अशा मोहिमांची माहिती बहुदा आधीच मिळत असल्याने ते अंतर्धान पावतात. त्यामुळे पोलिसांची कारवाई केवळ छाननी व वाहन तपासणी या पुरतीच सिमित राहते. गुन्हेगार व अवैध व्यवसाय शोध मोहिमेत काही कारवाई दाखवत हा सोपस्कार पार पाडला जात असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.
गुन्हेगारीच्या आलेखात पंचवटी वरच्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच महिन्यांत मालेगाव स्टँड, पेठफाटा, टकलेनगर, इंद्रकुंड, फुलेनगर, हनुमान वाडी चौक या ठिकाणी खूनाच्या सात घटना घडल्या. टवाळखोरांचा धुडगूस, टोळ्यांमधील युध्द हे तर या भागात नेहमीचेच. ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अलीकडेच पोलीस यंत्रणेला कानपिचक्या देऊन गुन्हेगारीचा बिमोड न केल्यास प्रशासनात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. गुन्हेगारीच्या मुद्यावर सर्व राजकीय पक्ष पोलीस यंत्रणेचा वचक राहिला नसल्याकडे लक्ष वेधत आहेत. त्या अनुषंगाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस आयुक्त व शासनास निवेदने दिली. पंचवटीतील वाढत्या गुन्हेगारीबद्दल राजकीय पदाधिकारी फारसे बोलत नसताना शहराचे प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांनी उशिरा का होईना त्यास छेद दिला. खुद्द मुर्तडक हे याच भागातून पालिका निवडणूक विजयी झालेले. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता या प्रश्नावर सर्वाचे प्रबोधन करण्याची खरी गरज असल्याचे नमूद केले. काही वर्षांपूर्वी मनसेने शहरात ‘भयमुक्त नाशिक’ हा उपक्रम राबविला होता. सध्याची स्थिती लक्षात घेऊन पुन्हा तोच उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाईल. आपल्या समोर एखादी घटना घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आवश्यक त्या यंत्रणांचे संपर्क क्रमांक व तत्सम माहिती दिली जाईल. सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित झाल्यास या गुन्हेगारी घटनांना पायबंद घालता येईल. तरुणांच्या प्रबोधनाची अधिक गरज आहे. संबंधितांच्या चुकांवर पालकांनी पांघरून घालता कामा नये, असेही त्यांनी सूचित केले.