राज्यात सत्तास्थानी येऊन अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येथे आयोजित महाआरोग्य शिबीर म्हणजे भाजपने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर असल्याची आगपाखड खुद्द मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीयांना निमंत्रित केल्याचा दावा भाजपने केला आहे. तथापि, शिवसेनेसह विरोधी मनसे, काँग्रेसने असे निमंत्रणच आले नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे  महाशिबीर होण्याआधीच त्याबाबत राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शहरात नवीन वर्षांचे स्वागत प्रथमच आरोग्यदायी उपक्रमाने होत आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अंतर्गत सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था, खासगी रुग्णालये व डॉक्टर अशी भलीमोठी यंत्रणा नियोजनासाठी जुंपण्यात आली आहे. जळगावमध्ये हे शिबीर आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव असणारे पालकमंत्री बारकाईने त्याचा आढावा घेत आहेत.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपने समन्वयक कार्यकर्त्यांची नियुक्ती केली. आमदार, पदाधिकारी आणि इच्छुकांनी शिबिराच्याद्वारे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पद्धतशीरपणे भाजपचा प्रचार चालविल्याचे चित्र आहे. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी तर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात समन्वयक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आरोग्याचा कुंभमेळा साजरा करण्याचे आवाहन केले. शिबिराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सध्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने शहरात प्राथमिक तपासणी केली जात आहे. भाजपकडून इच्छुक उमेदवारांचे फलक सर्वत्र झळकत आहेत.

हे शिबीर भाजपने आयोजित केल्याचे दर्शवत मित्रपक्ष शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेलाही चार हात दूर ठेवण्यात आले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, या उपक्रमाचे श्रेय केवळ भाजपला मिळावे, असा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न दिसतो. वास्तविक, राज्य शासनाच्या वतीने हे शिबीर होत असून इतर पक्षीय लोकप्रतिनिधींना सहभागी करून गोरगरिबांना औषधोपचाराच्या सुविधा देता येतील.

मात्र, भाजपने कोणालाही निमंत्रित न करता शासकीय अधिकारी व कर्मचारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याप्रमाणे वापर सुरू केल्याची टीका होत आहे. या उपक्रमाचे मित्रपक्ष शिवसेना तसेच विरोधी पक्षातील एकाही पक्षाला निमंत्रण नाही. सर्वाना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याची व्यूहरचना केल्याचा आक्षेप घेत सर्वपक्षीयांनी भाजपला घेरले आहे.

यामुळे भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना वेगवेगळ्या आजाराची लागण झाल्याची लक्षणे आहेत.

 

सर्वपक्षीय शिबीर

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप त्याचे श्रेय घेत नाही. कुठे पक्षाचा झेंडय़ाचाही वापर झालेला नाही. या आयोजनामागे महापालिका निवडणुकीचेही कारण नाही. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आले आहे. काही इतर पक्षांचे पदाधिकारी रुग्णांची नोंदणी होण्यासाठी मदत करत आहेत. गोरगरिबांसाठी मुंबई व पुण्यात जाऊन आधुनिक उपचार घेणे आणि त्यासाठी खर्च करणे परवडणारे नाही. स्थानिक पातळीवर मोफत स्वरूपात या माध्यमातून उपचार होतील. यावर जे आक्षेप घेतले जात आहेत, त्यात तथ्य नाही.

– आ. बाळासाहेब सानप (शहराध्यक्ष, भाजप)

 

शासकीय यंत्रणेचा गैरवापर

महाआरोग्य शिबीर हा शासनाचा कार्यक्रम असला तरी भाजप तो आपल्या पक्षाचा कार्यक्रम असल्याच्या आविर्भावात आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याचे मानून शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. या शिबिराबाबत भाजपने निमंत्रण दिले नाही. शिबीर सर्वपक्षीय असते तर सर्वपक्षीय नगरसेवक व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देता आले असते. मात्र, शासकीय कार्यक्रमाला पक्षीय स्वरूप देण्याची भाजपची कृती अचंबित करणारी असून त्यावर लेखी आक्षेप नोंदविला जाईल.

 

– शरद आहेर (शहराध्यक्ष, काँग्रेस)

 

सत्तेचा एकतर्फी उपयोग

महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजपने सत्तेचा एकतर्फी उपयोग केल्याचे महाशिबीर हे उदाहरण आहे. उशिरा का होईना त्यांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाटली हे कमी नाही. दर वर्षी भाजपने या शिबिराचे आयोजन करावे. हे सर्वपक्षीय शिबीर असल्याचे भाजप सांगत असले तरी संबंधितांनी शिवसेनेसह कोणालाही निमंत्रित केलेले नाही. निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, सुजाण नागरिकांना सर्व काही ज्ञात आहे. भाजपकडून घोषणाबाजी बरीच केली जाते. प्रत्यक्षात काय होते याची अनेक उदाहरणे आहेत. सरकारी योजनांद्वारे आरोग्य सुविधा देताना त्या भाजपच देत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.

– अजय बोरस्ते

(महानगरप्रमुख, शिवसेना)

 

..ही तर भाजपची खासीयत

 

मागील दोन ते अडीच वर्षांत भाजपला जे सुचले नाही, ते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुचले. महाशिबिराचा नागरिकांना उपयोग होणार असल्याने मनसेने त्यास विरोध केलेला नाही. शासकीय व्यवस्थेचा वापर करून गाजावाजा करणे ही भाजपची खासीयत आहे. ही प्रवृत्ती शिबिराच्या आयोजनातही दिसते. निवडणुकीच्या तोंडावर शिबिराद्वारे भाजप स्टंटबाजी करत आहे. महापालिकेत मनसेची सत्ता आहे. असे असतानाही भाजपने मनसेला शिबिराबाबत निमंत्रण दिलेले नाही.

– राहुल ढिकले

(शहराध्यक्ष, मनसे)

निमंत्रण नाही

महाआरोग्य शिबीर आणि त्या अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या आरोग्य सप्ताह या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे आणि नागरिकांना लाभ मिळवून द्यावा यासाठी भाजपकडून कोणतेही निमंत्रण आलेले नाही. पक्षाच्या नगरसेवकांना पालकमंत्र्यांचे या संदर्भातील एक पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

– रंजन ठाकरे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)