महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम. डी, एम. एस., पदविका आणि एम. एस्सी.च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या तातडीच्या बैठकीत कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी हा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार उन्हाळी २०१६ वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा २३ मे पासून सुरू होणार होत्या. मेडिकलच्या एम. डी., एम. एस. आणि एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ जुलैपासून सुरू होणार आहेत. तसेच मेडिकलच्या सर्व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ जूनपासून घेतल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण संचलनालय दक्षता घेणार असल्याचे सांगितले. २० केंद्रांवर १८३१ विद्यार्थ्यांची ही परीक्षा होणार होती. केवळ वैद्यकीय म्हणजे मेडिकल विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून उर्वरीत परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील असे परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.