News Flash

वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा

घोषणाबाजीने त्यांनी परिसर दणाणून सोडला.

औषधी विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण कामाचे आठ तास करावेत, औषधी कंपन्यांना वैद्यकीय प्रतिनिधींना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक करावे, २० हजार रुपये किमान वेतन आणि महागाई, घरभाडे भत्ता लागू करावा, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र विक्री, वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने बुधवारी येथील संप पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. घोषणाबाजीने त्यांनी परिसर दणाणून सोडला.

‘एमएसएमआरए’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत वैद्यकीय प्रतिनिधींच्या कायदेशीर न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध ठराव मंजूर केला होता. त्या ठरावानुसार महाराष्ट्र विक्री व प्रतिनिधी संघटनेच्या राज्य शाखेने बुधवारी राज्यव्यापी संपाची हाक दिली. त्यात नाशिक जिल्ह्य़ातील प्रतिनिधी सहभागी झाले. शाखा सचिव हर्षल देवरे, सहसचिव अमोल पाटील आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आपल्या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास दिले. वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाच्या तासात सुधारणा करणे गरजेचे आहे. अनेक औषधी कंपन्या वैद्यकीय प्रतिनिधींना नियुक्तीपत्र देत नाहीत. विक्री संवर्धन कर्मचारी अधिनियमानुसार अर्ज ए प्रमाणे औषधी कंपन्यांवर नियुक्तीपत्र देणे बंधनकारक करावे आणि तसे न केल्यास कंपन्यांवर कारवाई करावी, हा मुद्दा मोर्चेकऱ्यांनी मांडला. वैद्यकीय प्रतिनिधींना २० हजार रुपये किमान वेतन अधिक महागाई व घरभाडे भत्ता मिळणे गरजेचे आहे. बोनस, भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी कायद्याची अंमलबजावणी करावी, प्रस्तावित कामगार विरोधी कायदे सुधारणा रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:48 am

Web Title: medical representative protest in nashik drug sales employees
Next Stories
1 लष्करी सुरक्षेला नाशिक महापालिकेचा सुरुंग
2 इगतपुरी, त्र्यंबकेश्वर पालिका निवडणूक निकाल
3 वाहतूक पोलिसांची ‘अशीही बनवाबनवी’
Just Now!
X