21 September 2020

News Flash

रखडलेल्या स्मार्ट प्रकल्पांचे गौडबंगाल

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सार्वजनिक सायकल सेवा आणि ‘स्मार्ट पार्किंग’ची घोषणा झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

*   स्मार्ट सिटी विकास प्राधिकरण कंपनीची आज बैठक

*   शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

महानगरपालिका स्मार्ट सिटी विकास प्राधिकरण कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी दुपारी बारा वाजता आणि त्यानंतर दुपारी एक वाजता कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. स्मार्ट सिटीच्या अद्ययावत प्रकल्पांची माहिती देणे, स्मार्ट सिटी निधीद्वारे प्रगतिपथावर असणाऱ्या प्रकल्पांचा आढावा आणि प्रस्तावित प्रकल्पांची सूची विचारात घेऊन मान्यता देणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सार्वजनिक सायकल सेवा आणि ‘स्मार्ट पार्किंग’ची घोषणा झाली होती. परंतु, अनेक महिन्यांनंतरही ही व्यवस्था अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. स्मार्ट सिटी कंपनीने ऐन पावसाळ्यात स्मार्ट रस्त्याचे काम तातडीने सुरू केले, परंतु शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची नववी बैठक महापालिकेत होणार आहे. त्यात मंडळाच्या आधीच्या बैठकीच्या इतिवृत्ताची नोंद घेणे, स्मार्ट सिटीच्या अद्ययावत प्रकल्पाची माहिती, कंपनीचे लेखा परीक्षित वित्तीय विवरणपत्र, संचालक मंडळ आणि लेखा परीक्षकांचा अहवाल विचार घेऊन त्याचा अवलंब करणे, स्वतंत्र संचालक म्हणून तुषार पगार यांची पुनर्नियुक्ती, स्मार्ट सिटी निधीद्वारे कार्यवाही करण्यासाठी प्रकल्पांची सूची विचारात घेऊन मान्यता देणे, ‘आयसीटी’शी संबंधित विस्तृत प्रकल्प अहवाल, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या प्रश्नांबाबत निर्णय याविषयी विचार विनिमय करण्यात येणार आहे.

या बैठकीनंतर कंपनीची दुसरी वार्षिक सभा होईल. त्यात कंपनीचे वित्तीय विवरणपत्र, लेखा परीक्षकांचा अहवाल विचारात घेऊन त्याचा अवलंब करणे, माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी सीताराम कुंटे आणि प्राजक्ता लवंगारे यांची रोटेशन नियमानुसार नियुक्ती, नामनिर्देशित संचालक म्हणून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, हिमगौरी आहेर, शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांची नियुक्ती नियमित करणे, तुषार पगार यांची स्वतंत्र संचालक म्हणून पुन्हा नियुक्ती तर भास्करराव मुंढे यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती नियमित करणे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचे वेतन आदी विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातील.

स्मार्ट सिटी योजनेत यापूर्वी अनेक प्रकल्पांची कामे हाती घेतली गेली आहेत. प्रगतिपथावर असणाऱ्या कामांचा बैठकीत आढावा होणे अपेक्षित आहे. काही महिन्यांपूर्वी शहरात पीपीपी तत्त्वावर सार्वजनिक सायकल सेवा सुरू करण्यावर संचालकांनी शिक्कामोर्तब केले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाडेतत्त्वावर सायकल सेवा पुरविण्यात येणार आहे. या सेवेद्वारे वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. कित्येक महिने लोटूनही ही सेवा कार्यान्वित झालेली नाही. इंधनाचे दर गगनाला भिडले असताना नागरिकांना या सेवेतून दिलासा मिळणे शक्य होते. त्यात स्मार्ट सिटी कंपनीला अपयश आल्याची नागरिकांची भावना आहे. तशीच स्थिती स्मार्ट पार्किंग अर्थात वाहनतळाची आहे. वाहनतळ नसल्याने प्रमुख रस्त्यांवर अहोरात्र वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.

स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ३३ ठिकाणी वाहनतळाचे नियोजन करण्यात आल्याचे जाहीर झाले. महापालिकेसह इतरत्र स्मार्ट वाहनतळाची प्रायोगिक चाचणी पार पडली. भ्रमणध्वनी अ‍ॅपवर स्मार्ट वाहनतळात जागा आहे की नाही याची माहिती मिळणार होती. पण आजतागायत कुठेही असे स्मार्ट वाहनतळ दृष्टिपथास पडत नाही. त्यामुळे एकंदर निव्वळ घोषणांचाच हा बाजार आहे की काय, अशी चर्चा नाशिकककरांमध्ये सुरू झाली आहे. या संदर्भात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधितांनी बैठकीच्या तयारीत असल्याचे कारण देऊन बोलणे टाळले.

स्मार्ट रस्ता झटपट, मग सायकल सेवा, स्मार्ट पार्किंगचे काय?

स्मार्ट सिटी कंपनीने अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात युद्धपातळीवर हाती घेतले. या कामामुळे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सीबीएस ते मेहेर चौक या मार्गावरील वाहतूक एकाच भागातून दुहेरी सुरू असून त्यामुळे वाहनधारकांना दिवसरात्र वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. अर्धा किलोमीटरचा मार्ग पार करण्यासाठी वाहनधारकांना १५ मिनिटांपासून ते कधी कधी अध्र्या तासाचाही अवधी लागत असून विद्यार्थ्यांना शिवाजी स्टेडियमधून पायपीट करत शाळेत ये-जा करावी लागत आहे. कोटय़वधी रुपयांचे स्मार्ट सिटी रस्त्याचे काम सुरू करण्यात कंपनीने जी तत्परता दाखविली, तीच तत्परता सर्वसामान्यांना दररोज भेडसावणारे स्मार्ट वाहनतळ, सायकल सेवा सुरू करण्यास दाखविली नसल्याची नागरिकांची भावना आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्याने दुचाकी वापरणे खर्चीक झाले आहे. सायकल सेवा कार्यान्वित झाली असती तर विद्यार्थ्यांसह अनेकांना तिचा वापर करता आला असता. वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यास ती तत्परता दिसली नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 3:49 am

Web Title: meeting of the smart city development authority company
Next Stories
1 महापालिकेच्या त्रुटीजनक कारभारावर आयुक्तांचा प्रकाशझोत
2 स्वच्छ सर्वेक्षण, पोषण आहारात  नाशिक जिल्ह्याची कौतुकास्पद कामगिरी
3 भविष्यनिर्वाह निधीबाबत ‘आधार’ संभ्रम
Just Now!
X