‘आयएमए’तर्फे उपचार, शुश्रूषेसाठी पुढाकार

कर्करोगासह तत्सम दुर्धर आजारात रुग्णाच्या अखेरच्या काळात देखभाल, उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेने पुढाकार घेतला आहे. ‘हॉसपीस’ ही ती संकल्पना. मुंबईचा अपवाद वगळता अन्यत्र उपलब्ध नसलेली ही संकल्पना प्रथमच नाशिकमध्ये राबविली जाणार आहे. अखेरच्या काळात नातेवाईक नसलेल्या रुग्णांना या व्यवस्थेद्वारे मानसिक आधार देण्याचे काम करण्यात येणार आहे.

आयएमएच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी सात वाजता गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर, आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी आयएमएच्या नवीन उपक्रमांची माहिती दिली.

दुर्धर आजाराने पीडित रुग्ण अखेरच्या काळात वेदना सहन करीत असतात. उपचार करण्यासारखे काही राहिले नसल्याने रुग्णालयात ठेवण्याचा खर्च परवडणारा नसतो. हे लक्षात घेऊन आयएमए दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र टीबी सॅनिटोरियम येथे अशा रुग्णांसाठी ही व्यवस्था उपलब्ध करीत आहे. संबंधित रुग्णाच्या वेदना औषधांनी कमी करता येतात. परिचारिकांच्या सहाय्याने त्यांची शुश्रूषा करता येईल. अशी व्यवस्था कार्यान्वित केली जात असल्याचे डॉ. पलोड यांनी सांगितले. याशिवाय, सविता देसाई बाल रुग्णालयाच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांच्या आरोग्याची दक्षता घेतली जाते. या ठिकाणी आता महिलांना उपचाराची व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञांनी या ठिकाणी सेवा देण्याचे मान्य केले आहे.

दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र टीबी सॅनिटोरियमद्वारे क्षयरोगाच्या रुग्णांना सेवा देण्याचे काम संस्था करीत आहे. आगामी काळात डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संवाद दृढ करून सकारात्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. पलोड यांनी सांगितले. पद ग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. नीलेश निकम, डॉ. प्रशांत देवरे आदी सूत्रे स्वीकारणार आहेत.