News Flash

धक्कादायक! वडिलांचा अकस्मात मृत्यू; बहिण-भाऊ चार दिवस मृतदेहाजवळ बसून

आतून कोणीही दरवाजा उघडण्यास तयार नसल्याने पोलिसांनी धक्के देऊन तो उघडला

धक्कादायक! वडिलांचा अकस्मात मृत्यू; बहिण-भाऊ चार दिवस मृतदेहाजवळ बसून
प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : वयोवृद्ध वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगी आणि मुलगा त्यांच्या मृतदेहाजवळ बसून राहिल्याची घटना समोर आली आहे. थोडेथोडके नाही तर हे दोघे तब्बल ४ दिवस अशाप्रकारे आपल्या वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून होते. हे बहिण आणि भाऊ दोघेही मनोरुग्ण असल्याने त्यांनी असे केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या दोघांनीही आजुबाजूच्या कोणालाही याबाबतची माहिती न देता स्वत:ला मृतदेहाजवळ कोंडून घेतले. परिसरात दुर्गंधी सुटल्याने रहिवाशांनी पंचवटी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी याठिकाणी येऊन घराचे दरवाजे उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

अरुण विष्णुपंत पुराणिक हे कुटुंबियांसोबत शनिचौक परिसरात पुराणिक वाड्यात राहत होते. त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही मनोरुग्ण असल्याने ते दोघेही घरात स्वत:ला कोंडून घेत असत. अनेक दिवस ते घराबाहेर न पडल्याने त्यांचा नागरिकांशी जवळपास संपर्क तुटला होता. शनिवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून शनिचौक परिसरात दुर्गंधी पसरली. सुरूवातीला रहिवाशांनी मोकाट कुत्रे किंवा मांजर मृत झाली असावी असा अंदाज बांधत त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा संशय बळावला. त्यांनी चौकातील पुराणिक वाड्याजवळ जाऊन खात्री करण्याचा प्रयत्न केला असता दुर्गंधी वाड्यामधून येत असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आतून कोणीही दरवाजा उघडण्यास तयार नसल्याने पोलिसांनी धक्के देऊन तो उघडला. नाकातोंडाला रूमाल बांधून पर्फ्युमचा मारा करत पोलिसांनी घरात प्रवेश केला असता कुजलेल्या मृतदेहाजवळ दोघे भाऊ-बहिण रडत बसल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ दोघांना घराबाहेर आणले व मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. पुराणिक यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपासानंतर हे कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2019 4:38 pm

Web Title: mentally retarded childrens of aged man took four days and nights sitting near body of father nashik
Next Stories
1 श्रद्धांजली आणि निषेध
2 घंटागाडीच्या गैरकारभाराकडे अधिकाऱ्यांचे बोट
3 ऑनलाइन भाजी-फळे विक्री व्यवसायासाठी ‘अ‍ॅप’
Just Now!
X