परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या भूमिकेचा शेतकऱ्यांना जाच

नाशिक : गाळ्यांचे भाडे वाढविल्यावरून परप्रांतीय व्यापाऱ्यांनी कृषिमालाच्या लिलावावर अचानक बहिष्कार टाकल्याने बुधवारी दुपारी येथील बाजार समितीच्या आवारात गोंधळ उडाला. लिलाव बंद पडल्याने शेतकरी-व्यापारी यांच्यात खडाजंगी झाली. या गोंधळाला काही परप्रांतीय व्यापारी कारणीभूत असल्याचा आरोप बाजार समितीने केला. लिलाव बंद पाडण्याच्या कृतीची चौकशी करून प्रसंगी संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीने दिला आहे.

पंचवटीतील बाजार समितीच्या मुख्यालयात कृषिमालाचे व्यवहार होतात. दिवसभर चालणाऱ्या लिलावातून खरेदी होणारा माल व्यापारी मुंबईसह इतरत्र रवाना करतात. व्यापाऱ्यांना कृषिमाल ठेवण्यासाठी बाजार समितीने १५४ गाळे भाडे तत्त्वावर दिले आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या या गाळ्यांना अत्यल्प भाडे आहे. त्यात वाढ करून दर एकसमान करण्याचा बाजार समितीचा मानस आहे. त्या अनुषंगाने महिनाभरापासून व्यापारी-बाजार समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. बाजार समितीने सुचविलेला प्रति दिवस २०० रुपये दर व्यापाऱ्यांनी अमान्य केला. उभयतांमध्ये वारंवार चर्चा होऊन अखेर तो दर प्रथम ७०, नंतर ६० रुपयांपर्यंत खाली आणला गेला. तरीदेखील व्यापाऱ्यांनी तो अमान्य केला. दरवाढीच्या मुद्दय़ावरून चाललेला हा संघर्ष शेतकरी वर्गाला त्रासदायक ठरला.

सकाळी नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. काही व्यापाऱ्यांनी दुपारी अचानक लिलावावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आम्ही कृषिमाल खरेदी करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने शेतकरी संतप्त झाले. बाजारात काही असेही व्यापारी आहेत जे माल खरेदी करून तो रवाना करतात किंवा इतरत्र साठवणूक करतात. त्यांची कृषिमाल खरेदीची तयारी असताना काहींनी अडवणुकीची भूमिका घेतली.

समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, सचिव आदींनी धाव घेऊन मध्यस्थी केली. लिलाव बंद ठेवण्याबाबत लेखी पूर्वसूचना दिल्याशिवाय असा संप पुकारता येत नाही. बेकायदेशीरपणे लिलाव बंद पाडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यावर लिलाव पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला. तासभर हा गोंधळ होता.

आवारात वाहनांची मोठी गर्दी झाली. लिलाव सुरळीत झाल्यानंतर समितीचे पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. गाळ्यांच्या भाडय़ाबाबत चर्चा करण्यात आली. बाजार समितीने १०० चौरस फुटांच्या गाळ्याला दररोज ५० रुपये भाडे लागेल, असे निश्चित केले. हे देण्याची ज्या व्यापाऱ्यांची इच्छा असेल त्यांनी गाळे ठेवावेत अन्यथा खाली करावेत, असे सूचित करण्यात आले. परंतु, काही व्यापारी त्यास राजी नसल्याने हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

..तर व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी

काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दुपारी अकस्मात आम्ही लिलावात सहभागी होणार नाही आणि इतरांना माल खरेदी करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. पूर्वसूचना न देता संप पुकारणे, लिलावात इतर व्यापाऱ्यांना प्रतिबंध करणे बेकायदेशीर आहे. या घटनेची चौकशी करून बाजार समिती अशी भूमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रसंगी फौजदारी कारवाई करेल.

शिवाजी चुंभळे  (सभापती, बाजार समिती)

गाळे भाडे २०० वरून ५० रुपयांवर

नाशिक बाजार समितीचे पंचवटीत एकूण १५४ गाळे आहेत. वेगवेगळ्या आकारांचे हे गाळे अल्प दराने व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. या गाळ्यासाठी समितीने प्रति दिवसासाठी समान दर निश्चित करण्याचे ठरवले. दहा बाय दहा चौरस फुटांच्या गाळ्यासाठी प्रथम २०० रुपये प्रतिदिन भाडे निश्चित करण्यात आले. व्यापाऱ्यांनी ते अमान्य केले. व्यापारी-बाजार समितीत चर्चा होऊन ते ६० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले. तरीदेखील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. आता बाजार समितीने ५० पैसे चौरस फूट म्हणजे दहा बाय दहा आकाराच्या गाळ्याला प्रति दिवस ५० रुपये भाडे निश्चित केले आहे. ज्यांना परवडेल, त्या व्यापाऱ्यांनी गाळे घ्यावे, अन्यथा समितीला परत द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे.