19 January 2021

News Flash

ऑनलाइन शालेय परीक्षेचा गुंता सुटेना

महापालिका शाळांकडे नियोजनाचा अभाव

महापालिका शाळांकडे नियोजनाचा अभाव

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा ऑनलाइन पद्धतीने झाला असला तरी दिवसागणिक हा गुंता वाढत आहे. ऑनलाइन शिक्षण सर्वदूर न पोहचल्याने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांची परीक्षा घेतली जात आहे. महापालिका स्तरावर अद्याप याचे नियोजन नसले तरी खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू झाली आहे.

करोनाच्या सावटाखाली नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली.  दोन महिन्यांचा कालावधीही उलटला आहे.  ऑनलाइन की ऑफलाइन या वैचारिक मंथनानंतर शिक्षण विभागाकडून ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेत तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न होत आहे.

यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम  होत असताना केलेल्या अभ्यासाची फलश्रुती काय हे पाहण्यासाठी परीक्षांचे वेध शिक्षक-विद्यार्थ्यांना लागले आहेत. हा परीक्षांचा गुंता सुटण्यात अडचणी येणार असल्याने महापालिका स्तरावर याबाबत अद्याप नियोजनास सुरुवात नाही.

उलटपक्षी खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होत सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षेला सुरुवात होत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच काही अपवाद वगळता मराठी शाळांनी ऑनलाइनचे बोट धरत पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या समूहावरून संदेशाची देवाण-घेवाण करताना परीक्षांचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक, विषयनिहाय प्रश्नपत्रिकेची लिंक अशी माहिती दिली जात आहे. ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप ‘विकल्प’ स्वरूपात राहणार असून ठरावीक अर्ध्या तासात ही परीक्षा गुगल क्लासरूमवरून द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्याचक्षणी आपल्याला किती गुण मिळाले हेही समजणार आहे.

दरम्यान, परीक्षा ऑनलाइन असो की ऑफलाइन, शिक्षक आणि पालक यांची नजर आपल्यावर राहणार नसल्याने विद्यार्थी आनंदित आहेत. तर ही कसली परीक्षा असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.

प्रश्नपत्रिका घरपोच

मराठी शाळांमध्ये सर्वच विद्यार्थी ऑनलाइन नसल्याने हा प्रश्न ‘लिखित स्वरूपातील प्रश्नपत्रिकेच्या’ माध्यमातून निकालात काढला आहे. शहर तसेच जिल्हा परिसरातील बहुतांश मराठी माध्यमांच्या शाळांनी लिखित स्वरूपात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्याचे ठरविले आहे. या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना घरपोच देत त्यांचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा शाळेत वेळेनुसार उत्तरपत्रिका जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 3:30 am

Web Title: mess in online school exams zws 70
Next Stories
1 कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष
2 करोनामुळे नोटा, मुद्रांक, पारपत्रांची छपाई चार दिवस बंद
3 नव्या आयुक्तांसमोर करोना नियंत्रणाचे आव्हान
Just Now!
X