23 January 2020

News Flash

नाशिककरांसाठी भविष्यात ‘मेट्रो निओ’!

४ वर्षांत प्रकल्प साकारण्याचे नियोजन

४ वर्षांत प्रकल्प साकारण्याचे नियोजन

सार्वजनिक जलद वाहतुकीची भविष्यातील गरज लक्षात घेऊन महा मेट्रोने शहरासाठी टायरवर आधारित ‘मेट्रो निओ’ची अनोखी संकल्पना मांडली असून या प्रकारची ही देशातील पहिलीच व्यवस्था ठरणार आहे. १८०० कोटींचा हा प्रकल्प चार वर्षांत साकारण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत गंगापूर-नाशिकरोड आणि गंगापूर-मुंबईनाका या दरम्यान उड्डाणपुलासारख्या स्वतंत्र मार्गिका तयार केल्या जातील. इतर भागांतील नागरिकांना सेवेचा लाभ घेता यावा म्हणून अन्य दोन पुरवठा मार्गावर इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणस्नेही, प्रदूषण-आवाजरहित, आरामदायी, किफायतशीर अशी ही सेवा पुढील तीन ते चार दशकांची गरज भागवेल, असा महा मेट्रोला विश्वास आहे.

या प्रकल्पाचा अहवाल लवकरच शासनास सादर केला जाणार असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून हा मेट्रो प्रकल्प राबविला जाईल. मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर नाशिकमध्ये मेट्रो धावणार असली तरी त्यामध्ये फरक आहे. इतर शहरांमधील रेल्वे रुळावरील, तर नाशिकची मेट्रो रबरी टायरवर धावणारी असेल. यामुळे खर्चात मोठी बचत होणार असल्याचे दीक्षित यांनी नमूद केले. इतर शहरांमध्ये मेट्रोसाठी प्रति किलोमीटर २५० ते ४०० कोटी खर्च आला आहे. हाच खर्च नाशिकच्या प्रकल्पात केवळ प्रति किलोमीटर ६० कोटी होईल. या प्रकल्पाचा फारसा आर्थिक भार महापालिकेवर पडू नये, असा प्रयत्न आहे. एकूण प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम कर्ज स्वरुपात उभारली जाईल. उर्वरित ४० टक्के रकमेतील निम्मा निम्मा हिस्सा केंद्र, राज्य शासन उचलणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ती जागा देण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित ही देशातील पहिलीच मेट्रो ठरेल. या व्यवस्थेने शहराची पुढील ३० ते ४० वर्षांची गरज पूर्ण होईल. शिवाय भविष्यात याच व्यवस्थेच्या आधारे पुढील काळात तो विस्तारता येईल. या प्रकल्पासाठी जे दोन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत, त्यात मध्यवर्ती बसस्थानक अर्थात सीबीएस हे दोन्ही मार्गासाठी सामायिक स्थानक राहील. येथून प्रवाशांना आपला मार्ग बदलता येईल. शहराच्या सुमारे ८० टक्के भागाला मेट्रोचा लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यात इतर भागांत दोन पुरवठा मार्ग तयार केले जातील. त्या मार्गावर इलेक्ट्रिक बसचा वापर करून प्रवाशांची मुख्य मेट्रो मार्गावर ये-जा करण्याची व्यवस्था केली जाईल. सादरीकरणावेळी बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांसह महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित मार्गाचे नियोजन

 • गंगापूर-नाशिक २२ किलोमीटरच्या मार्गावर १९ स्थानके
 • गंगापूर-मुंबईनाका या १० किलोमीटरच्या मार्गावर १० स्थानके
 • मेट्रो मार्गावर सीबीएस संयुक्त स्थानक
 • मुख्य मेट्रो मार्गावर येण्यासाठी दोन स्वतंत्र पुरवठा मार्ग
 • मुंबईनाका, गरवारे मार्गे सातपूर आणि नाशिकरोड स्थानक नांदुरनाका मार्गे शिवाजीनगर (प्रत्येकी १२ किलोमीटर)
 • द्वारका चौकात मेट्रो मार्ग उड्डाणपुलावरून जाईल.

वैशिष्टय़े

 • २००-३०० प्रवाशांची वहन क्षमता
 • मेट्रोला रबरी चाके
 • इलेक्ट्रिकवर धावणार
 • स्वयंचलित दरवाजे
 • प्रवाशांना माहिती देण्याची अंतर्गत व्यवस्था
 • प्रदूषण-आवाजरहित, पर्यावरणस्नेही

First Published on July 23, 2019 2:48 am

Web Title: metro neo nashik mpg 94
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांवरून भाजपवर निशाणा
2 संधी गेली, आता पुढील संमेलनासाठी आशावादी
3 धक्कादायक ! शालेय साहित्य मागणाऱ्या मुलांना दारुड्या बापाने पाजलं विष
Just Now!
X