रेल्वे स्थानकांतून मुक्तपणे प्रवेश

नाशिक : परराज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करणे बंधनकारक असले तरी रेल्वे स्थानक असो किं वा रस्ते मार्ग, कुठेही परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना ही तपासणी केली किंवा नाही याची साधी विचारणाही होत नसल्याचे चित्र आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकात सध्या दैनंदिन ५० ते ६० रेल्वे गाडय़ा येतात. त्यातून दोन ते अडीच हजारहून अधिक प्रवासी उतरतात. कुणी विचारणारे नसल्याने ते सहजपणे स्थानकाबाहेर पडत आहेत.  रस्ते मार्गावरही वेगळी स्थिती नाही.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिकसह राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील अनेक भागांत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. करोनावर नियंत्रण आणण्यासाठी विविध पातळीवर निर्णय घेतले जात आहेत. त्या अंतर्गत संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांत केलेली जलद प्रतिजन चाचणी नकारात्मक असणे बंधनकारक आहे. या प्रवाशांच्या अहवालाची पडताळणी बंधनकारक आहे. दैनंदिन येणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रशासनाला देण्यास सांगण्यात आले आहे. अलीकडेच हा निर्णय घेतला गेला असला तरी नाशिक रोडसह जिल्ह्यातील अन्य रेल्वे स्थानकांमध्ये त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

रेल्वे मार्गाने आजही परराज्यांतील प्रवासी मुक्तपणे जिल्ह्यात प्रवेश करू शकतात. गेल्या वर्षी परराज्यांतील प्रवाशांची स्थानकांवर प्रतिजन चाचणी केली जात होती. तीदेखील कधीच गुंडाळण्यात आली आहे. येणाऱ्या प्रवाशांकडे चाचणी अहवाल आहे की नाही याची साधी विचारणा होत नाही. नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील कक्षात महापालिकेने काही कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यामार्फत दैनंदिन किती प्रवासी आले याची अंदाजे आकडेवारी संकलित केली जाते. २४ तासांत साधारणपणे दोन ते अडीच हजार प्रवासी येतात. दिल्लीहून येणाऱ्या राजधानी, मंगला एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रत्येकी ६० ते ७० इतकी असते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाबमधून अनेक गाडय़ा येतात. यातील काही राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्या भागातून येणारे प्रवासी आरटीपीसीआर चाचणी करतात की नाही, हे कुणालाही माहिती नाही.  शासनाच्या आदेशान्वये रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी वा त्यांचे अहवाल पडताळणीसाठी व्यवस्था करण्याची मागणी रेल्वे पोलिसांनी केल्याचे सांगितले जाते.