अविनाश पाटील

बागलाण तालुक्यातील काही गावांचे भवितव्य कठीण

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्य़ातील निम्म्या तालुक्यांमध्ये बिकट परिस्थिती उद्भवली असून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी  प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक गावांपुढे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे. बागलाण हा यापैकीच एक तालुका. या तालुक्यात सध्या सात टँकरव्द्वारे काही गावांना पाणी पुरविले जात असून ताहाराबाद, दसवेल, जायखेडा या परिसराचा अपवाद वगळता इतरत्र विशेषत: नामपूर ते चिराईपर्यंतच्या गावांमध्ये टंचाईची भीषणता अधिक आहे. त्यामुळे या गावांमधील बहुतेकांपुढे स्थलांतराचे संकट उभे ठाकले आहे.

बऱ्यापैकी पाऊस झाल्यास नदीकाठच्या गावांची चिंता मिटते, परंतु यंदा किरकोळ अपवाद वगळता पाऊसच झाला नसल्याने नदीकाठची गावेही हादरली आहेत. नामपूर ते साक्री रस्त्यावरील गावांची समस्या वेगळीच आहे. बिजोरसे, वरचे आणि खालचे टेंभे, तळवाडे, बहिराणे, चिराई या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून टंचाईची स्थिती आहे. परंतु सध्या जाणवत असलेली टंचाई भीषण असल्याचे या गावांमधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशी टंचाईमागील अनेक वर्षांपासून अनुभवली नव्हती, असे बहिराणे येथील युवा शेतकरी विजय धोंडगे यांनी सांगितले. गावचे सरपंच भाऊसाहेब धोंडगे यांचेही तेच म्हणणे आहे.  संपूर्ण गाव हातपंपावरील पाण्यावर अवलंबून आहे. हातपंपातून पाणी येणेही दिवसेंदिवस कमी होत चालले असून तो अजून फार तर एखादा महिना गावाची तहान भागवेल. त्याच्यानंतर काय, टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान एक वेळ भागवली जाऊ शकेल, परंतु जनावरांसाठी कुठून पाणी आणणार, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था काय, असे प्रश्न विजय धोंडगे यांनी उपस्थित केले आहेत.  खालचे टेंभे या गावाच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम आखणारे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनाही आता या दुष्काळातून गावाला सावरण्यासाठी वेगळे उपाय आखावे लागणार आहेत.

गावात थांबून कोणताही फायदा होणार नसल्याने स्थलांतराशिवाय दुसरा पर्यायच ग्रामस्थांपुढे उरलेला नाही. टंचाईच्या या परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणाम शेतीवर आधारित उद्योग, व्यवसायांवर होऊ लागला असल्याचे नामपूर येथील व्यावसायिक संजय सूर्यवंशी यांनी निदर्शनास आणून दिले. बागलाण तालुक्यात सटाण्यानंतर नामपूर ही सर्वाधिक मोठी बाजारपेठ असून परिसरातील पंधरा ते वीस खेडी बाजार तसेच इतर कोणत्याही

खरेदी-विक्रीसाठी नामपूरवरच अवलंबून असतात. टंचाईमुळे शेतकऱ्यांकडे पैसा येणे बंद झाल्याने आणि पिकांवर औषध, फवारणी करून, खते देऊनही पाण्याअभावी ती जगणे शक्य नसल्याने शेतकरी दुकानांकडे वळतच नसल्याचे सूर्यवंशी यांनी नमूद केले.