मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत

मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा प्रभाव कार्यकर्त्यांची धरपकड झाल्यानंतर ओसरला. त्यामुळे मुंबईचा दुधपुरवठा सुरळीत झाला आहे. रात्री बारा वाजेपासून मंगळवारी दुपापर्यंत सुमारे ४० टँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईसह इतरत्र रवाना करण्यात आले, असे जिल्हा, पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, यासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कसारा घाट, घोटी टोल नाका आणि सिन्नर येथे आंदोलन केले होते. सिन्नर येथे दूध टँकर रोखल्या प्रकरणी ११ जणांना अटक केली गेली, तर घोटी टोल नाक्यावर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. कसारा घाटात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना कसारा पोलिसांनी अटक केली. जिल्ह्य़ातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखला जाऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनेकांना नोटीस बजावली गेली. आंदोलनकर्त्यांची धरपकड झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा प्रभाव कमी झाल्याचे पहावयास मिळाले. दुपापर्यंत ग्रामीण भागात कुठेही टँकर रोखणे किंवा तत्सम प्रकार घडले नसल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील मार्गावरून दररोज एक लाख ३८ हजार लिटर दूध मुंबईला पाठविले जाते. त्यात खंड पडू नये म्हणून प्रशासनाने दूध संकलन करणारी केंद्रे, उत्पादक संघ आणि टँकरला पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी केली आहे. आंदोलनामुळे नियमित दूध संकलन घटण्याची धास्ती व्यक्त केली जात होती. आंदोलनाची झळ बसू नये म्हणून काही संघांनी संकलन न करणे पसंत केले. ही स्थिती हळूहळू बदलली आहे. नेहमीच्या तुलनेत मुंबईला जाणाऱ्या दुधाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

नाशिक, जळगाव, धुळे, नगर या भागातील दूध जिल्ह्य़ातून मुंबईला पाठविले जाते. जिल्ह्य़ात दररोज ५० ते ६० हजार लिटर दुधाची आवक होते. दूध वितरण व्यवस्था सुरळीत असल्याने आवक आणि पाठवणी यामध्ये कोणताही फरक पडला नसल्याचा दावा प्रशासनाने केला. दरम्यान, कसारा घाटात आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना कसारा पोलिसांनी अटक केली होती. कार्यकर्त्यांची धरपकड झाल्यामुळे आंदोलनावर मर्यादा आल्याचे संबंधितांनी मान्य केले.

चाळीसहून अधिक टँकर बंदोबस्तात रवाना

मंगळवारी ग्रामीण भागात कुठेही आंदोलन झाले नाही. सोमवारी सिन्नर, घोटी येथे आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. स्थानिक पातळीवर दूध संकलन आणि वितरण व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने टँकर सुरक्षितपणे जिल्ह्य़ाबाहेर नेण्याकरिता खास मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली. त्याआधारे जिल्ह्य़ातील मार्गावरून पोलीस बंदोबस्तात एकत्रितपणे टँकर मुंबईकडे नेण्यात आले. रात्री बारा वाजेपासून दुपापर्यंत सुमारे ४० हून अधिक टँकर बंदोबस्तात रवाना करण्यात आले आहे.     – संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण