News Flash

नाशिककरांच्या सेवेसाठी ६९ कोटय़धीश नगरसेवक

भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांचा समावेश

भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांचा समावेश; २७ जणांवर गुन्हेगारी प्रकरणे

महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणारे भाजपचे चार, शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे प्रत्येकी दोन नगरसेवक असल्याची माहिती महाराष्ट्र इलेक्शन वॉच संस्थेने दिली आहे. दुसरीकडे निवडून आलेल्यांपैकी ६९ नगरसेवक हे कोटय़धीश आहेत. त्यात भाजपच्या सर्वाधिक म्हणजे २५ नगरसेवकांचा समावेश आहे. श्रीमंत नगरसेवक आहेत, तसे डोक्यावर कर्जाचा मोठा भार असणारे नगरसेवक आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर संस्थेने केलेल्या पाहणीत विजयी झालेल्या उमेदवारांची माहिती समोर आली आहे. निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजे ६६ जागा मिळविल्या. या पक्षाच्या सात टक्के नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेलेली शिवसेना या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विजयी उमेदवारांपैकी २७ जणांवर गुन्हेगारी प्रकरणे आहेत. त्यातील १७ जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

निवडून आलेले बहुतांश नगरसेवक गर्भश्रीमंत वर्गात मोडणार आहेत. त्यात भाजपचे ३५ तर शिवसेनेचे २० नगरसेवक कोटय़ाधीश आहेत. काँग्रेसचे पाच, मनसे, राष्ट्रवादी व अपक्षांच्या प्रत्येकी तीन जणांचा या गटात समावेश आहे. विजेत्या उमेदवारांकडील सरासरी मालमत्ता तीन कोटी ५५ लाख रुपये असल्याचे अहवाल सांगतो.

प्रभाग क्रमांक दोनमधून विजयी झालेले भाजपचे उध्दव निमसे हे सर्वात श्रीमंत नगरसेवक आहेत. त्यांच्या मालमत्तेचे मूल्य २४ कोटी रुपये इतके आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले यांच्याकडे २० कोटी ४३ लाख, शिवसेनेच्या कल्पना चुंबळे १९ कोटी ५६ लाख, भाजपचे शशिकांत जाधव १९ कोटी ४९ लाख, राष्ट्रवादीचे गजानन शेलार १३ कोटी ६२ लाख, भाजपचे दिनकर आढाव १२ कोटी ३६ लाख, भाजपच्या संगिता गायकवाड १२ कोटी तीन लाख, सेनेचे दत्तात्रय सूर्यवंशी १० कोटी ४५ लाख, मनसेचे सलीम शेख १० कोटी ४१ लाख, सेनेचे शामकुमार साबळे १० कोटी २२ लाखाच्या मालमत्तेचे धनी आहेत.

पाच तरुण नगरसेवक

निवडणुकीत तीन लाखापेक्षा कमी मालमत्ता जाहीर करणारे सहा नगरसेवक आहेत. मालमत्ता असताना डोक्यावर कर्ज असणारे नगरसेवक आहेत. एक ते पाच कोटी देणे असलेल्या नगरसेवकांची संख्या दहा आहे. यंदा महापालिकेत २१ ते २४ वयोगटातील पाच नगरसेवक असून ११ जण २५ ते ३० वयोगटातील आहेत. २९ जणांचे वय ३१ ते ४० च्या दरम्यान आहे. ३७ विजेते उमेदवार ४१ ते ५० वयोगटातील असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:23 am

Web Title: millionaire councilors in nashik
Next Stories
1 देवळालीमधील जवानाच्या आत्महत्येचे गूढ वाढले
2 सांस्कृतिक कार्यक्रमप्रेमींची प्रबोधनाकडे पाठ
3 पुन्हा निवडणुकीसाठी पराभूत उमेदवारांचे आंदोलन
Just Now!
X