पावसाच्या धास्तीने संख्येत घट

नाशिक : ‘बम बम भोले’च्या गजरात तिसऱ्या श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा योग साधला. अगदी सोमवारी दुपापर्यंत भाविक प्रदक्षिणेसाठी जात होते. या वर्षी दोन लाखहून अधिक भाविक प्रदक्षिणेत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. काही वर्षांच्या तुलनेत भाविकांची संख्या बरीच कमी झाली. यामागे मध्यंतरी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पुराची धास्ती हे कारण असल्याचे पुरोहित सांगतात. राज्य परिवहनने ३०० बसगाडय़ांमधून भाविकांची अव्याहतपणे वाहतूक केली.

श्रावण महिन्यात ब्रह्मगिरीच्या तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणेत दरवर्षी सर्वाधिक भाविक सहभागी होतात. यंदा पाऊसमान चांगले असल्याने भाविक मोठय़ा संख्येने येतील, असा अंदाज होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नेहमीप्रमाणे भाविकांचे जत्थे रविवारी दुपारनंतर त्र्यंबक नगरीत दाखल होऊ लागले. एरवी सोमवारी दुपापर्यंत बहुतांश भाविकांची प्रदक्षिणा पूर्ण होते. यंदा मात्र सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत गटागटाने दाखल होऊन कुशावर्त तीर्थावर भाविक स्नान करत होते. तेथून प्रदक्षिणा मार्गाकडे ते रवाना झाले. सायंकाळी उशिरापर्यंत हे भाविक परतत होते. बम बम भोलेच्या गजराने वातावरणातील उत्साह वाढवला. गर्दीत धार्मिक भावनेतून प्रदक्षिणा करणारे होते, तसेच पर्यटन म्हणून सहकुटुंब आलेले देखील होते. काही नशापाणी करणाऱ्या हुल्लडबाजांमुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मराठवाडय़ातील महिला भाविकांची संख्या अधिक राहिली. प्रदक्षिणा मार्गात अनेक सामाजिक संस्था, मंडळांनी भाविकांना फराळाचे पदार्थ,चहापाणी, फळांचे मोफत वाटप केले. ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी प्रथमोपचाराची व्यवस्था करून सेवा दिली. त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

नाशिकहून त्र्यंबकला भाविकांची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहनने ३०० बसगाडय़ांची व्यवस्था केली होती. दिवसभरात बसमधून अव्याहतपणे फेऱ्या करून हजारो भाविकांची वाहतूक करण्यात आली.

पावसाचा धसका

दिवसभरात दोन लाखहून अधिक भाविक फेरीत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे त्र्यंबक नगरीत पूरस्थिती निर्माण झाली होती. गोदावरीच्या महापुराचा नाशिक शहराला तडाखा बसला. अतीवृष्टी, पुराचा भाविकांनी मुख्यत्वे धसका घेतल्याचे स्थानिक पुरोहितांनी सांगितले. मुसळधार पावसानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये पूजाविधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. ब्रम्हगिरी प्रदक्षिणेत राज्यातील वेगवेगळ्या भागातून भाविक सहभागी होतात. यंदा मात्र अनेकांनी पावसाचा धसका घेतला.