अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच थांबावे

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयीच थांबावे; अन्यथा कारवाईस सामोरे जावे, असा इशारा आमदार नितीन पवार यांनी तहसील कार्यालयात आयोजित तालुका आढावा बैठकीत दिला. बैठकीत विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

सुरगाणा परिसरात गरोदर मातांची प्रसूती न करता त्यांना नाशिकला पाठवले जाते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी काय कामे करतात, असा प्रश्न आमदार पवार यांनी उपस्थित केला. गरोदर मातांना नाशिकला पाठविणे बंद करा, काम करताना मुखपट्टीचा वापर बंधनकारक करा, बाऱ्हे येथील रुग्णालयात खाटा उपलब्ध करा, संरक्षण साहित्य उपलब्ध करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

एकात्मिक  बालविकास प्रकल्पात अंडे मिळत नसल्याच्या तक्रोरी होत आहेत. बोरगाव ते घागबारी, बोरगाव ते बर्डीबाडा रस्त्यावरील खड्डे बुजवा, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही असे नियोजन करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.

उपसभापती इंद्रजीत गावित यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह तालुक्यात ८२४ पैकी ५०६ शिक्षक नाशिक येथून ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती व्यक्त के ली. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्यात राहूनच काम करावे. जे कामाच्या ठिकाणी राहात नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न गावित यांनी उपस्थित के ला.

गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी जे शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी थांबणार नाहीत, अशा शिक्षकांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येईल, असे सांगितले.बैठकीस प्रांताधिकारी विकास मीना, तहसीलदार विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

विविध विषयांवर चर्चा

या बैठकीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना, वनजमिनी सातबारा, वनपट्टे प्रमाणपत्र, नुकसानभरपाई अनुदान वाटपाबाबत अडचणी, खावटी अनुदान योजना, वीज वितरण प्रश्न, शालेय आणि अंगणवाडी पोषण आहार, मागील तीन वर्षांतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला.