15 July 2020

News Flash

करोना संकटाविरुद्ध प्रशासकीय लढाईत उपायुक्त रात्रंदिन कार्यरत 

तीन महिने कोणतीही उसंत न घेता करोनाविरोधातील व्यवस्थापनात सक्रिय

तीन महिने कोणतीही उसंत न घेता करोनाविरोधातील व्यवस्थापनात सक्रिय

प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे करोनाचे उत्तर महाराष्ट्रातील केंद्रबिंदू ठरलेल्या मालेगावात करोनाविरोधातील लढाईत अनेक घटक आपापल्या परीने योगदान देत आहेत. महापालिका हद्दीत या युध्दात सेनापती म्हणून शिरावर जबाबदारी असलेले उपायुक्त नितीन कापडणीस यांचे योगदान असेच उल्लेखनीय म्हणावे लागेल. पदोपदी अडचणींचे जाळे असलेल्या मालेगावसारख्या ठिकाणी अडीच, तीन महिने कुठलीही उसंत न घेता करोनाविरोधात व्यवस्थापन करण्यात कापडणीस यांनी स्वत:ला अहोरात्र गुंतवून घेतले आहे.

करोना विषाणू संसर्गासाठी मालेगावातील एकूणच भौगोलिक परिस्थिती अत्यंत पोषक आहे. त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत करोना संकटाला तोंड देणे मालेगावसाठी खचितच अवघड बाब. त्यातही करोना संकटाच्या व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व असलेल्या महापालिकेच्या अस्थापनेतील तब्बल ६० टक्के पदे आजच्या घडीला रिक्त असून करोनाच्या भीतीमुळे त्यातील अनेकांचा जबाबदारी न स्वीकारण्याकडे प्रारंभी कल राहिल्याने करोना बरोबरच प्रशासनाला अन्य अडचणींना तोंड द्यावे लागले. यातून मार्गक्रमण करतांना  उपायुक्त कापडणीस यांची कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. करोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या जीवन रुग्णालयात जाण्यास पहिल्या दिवशी एकही डॉक्टर तयार होत नव्हते. तेव्हां या डॉक्टरांची मनधरणी केल्यानंतर पीपीई संच परिधान करून स्वत: कापडणीस हे रुग्णालयात दाखल झाले होते. यानंतर रुग्णालय सुरू झाल्यावर पहाटे तीनच्या सुमारास एका मौलानांचे उपचार सुरू असतांना निधन झाले. या मौलानांच्या भक्तांची गर्दी होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याचा धोका असल्याने हा दफनविधी शक्य तितक्या लवकर करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु, मृतदेह विशिष्ट कापडात आणि विशिष्ट पद्धतीने गुंडाळण्याचे काम करण्यास कोणी धजावत नसल्याने पंचाईत झाली. सामान्य रुग्णालयात असे काम करणाऱ्या व्यक्तीचा तेवढय़ा रात्री शोध घेत महत्प्रयासाने त्याला तयार करण्यात आले. एके दिवशी चाचणीसाठी एकूण ३३० नमुने घेण्यात आले. त्यापैकी ५० नमुने धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उर्वरित २८० नमुने घेऊन पालिकेचा संबंधित कर्मचारी नाशिकच्या प्रयोगशाळेत गेला. परंतु, या प्रयोगशाळेत मालेगावसाठीच्या दरदिवशी चाचणीची कमाल क्षमता १८० इतकीच असल्याने हे नमुने घेण्यास नकार मिळाल्याने अडचण झाली. चाचणीसाठी तातडीची निकड लक्षात घेता पुणे येथील प्रयोगशाळेत ते पाठविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार नाशिकला गेलेल्या कर्मचाऱ्याने परस्पर पुण्याला गाडी नेण्याचे नियोजन झाले. परंतु, पुण्याला न जाता हा कर्मचारी गाडी घेऊन सरळ मालेगावी परत आला. भ्रमणध्वनी बंद असल्याने त्याच्याशी संपर्कही होत नव्हता. त्यामुळे प्रशासनाची मोठीच त्रेधातिरपीट उडाली. शेवटी पोलिसांच्या मदतीने त्याला धुंडाळण्यात आले. विनंती करुनही पुणे येथे जाण्यास त्याने नकार दिल्याने कापडणीस यांनी स्वत: पुणे येथे जाण्याचे जाहीर केले. तसेच राष्ट्रीय आपत्तीत सेवा कामी येत नसेल तर सारे व्यर्थ आहे, या भाषेत कर्मचाऱ्याला समज दिली. ही मात्रा लागू पडून कर्मचाऱ्याचे मन परिवर्तन झाले.

सुट्टी न घेता अव्याहतपणे काम

चार महिन्यांत कापडणीस यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. करोना संकट उद्भवल्यानंतर तर शनिवार, रविवारची सुट्टीही त्यांना ठाऊक नाही. करोना संकटात ते रात्रंदिन कार्यमग्न दिसतात. बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे खरेतर त्यांना विलगीकरणात जाण्याचा पर्याय उपलब्ध होता.  खबरदारी म्हणून तीन वेळा त्यांनी करोना चाचणी करून घेतली. प्रत्येक वेळी ती नकारात्मक आली. दिवसभर लिंबू मिश्रित गरम पाणी पिण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. तसेच अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीच्या गोळ्यांचे सुरुवातीलाच सेवन केले होते, असे ते आवर्जून सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:07 am

Web Title: mmc deputy commissioner nitin kapadnis important contribution against coronavirus zws 70
Next Stories
1 टाळेबंदीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
2 नाशिक विभागात रुग्ण संख्या बावीसशेच्या दिशेने
3 Coronavirus : नाशिक विभागात रुग्ण संख्या बावीसशेच्या दिशेने
Just Now!
X