नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप आणि शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भाजपला पर्यायी शब्द भाजप आहे आणि मुख्यमंत्री भाजपकुमार थापाडे आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपसोबतच शिवसेनेलाही राज ठाकरेंनी लक्ष्य केले.

‘नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून जे काम केले, ते मनापासून केले. निविदांच्या माध्यमातून पैसे खाण्याची मला सवय नाही. बाकीच्या पक्षांना फक्त शहरांना ओरबाडून पैसे खायचे आहेत. नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार करु न दिल्याने अनेकांनी पक्ष सोडला. भाजपने त्यांच्यासमोर पैसे फेकले. त्यामुळे काही लोक भाजपमध्ये केले,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांवर घणाघाती टीका केला.

‘नाशिक महापालिकेवर गेल्या पाच वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात असताना नाशिक महापालिकेला आयुक्त देण्यात आला नाही. मात्र तरीही नाशिक महापालिकेने चांगले काम केले आहे. एल एँड टी, जीवीके, टाटा, महिंद्रा यासारख्या कंपन्यांच्या सीआरएस फंडातून नाशिकमध्ये अनेक कामे झाली आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या उपलब्ध आहेत. या गाड्या नेमक्या कोणकोणत्या भागात त्यावर जीपीएसच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. नाशिकमधील अनेक रस्त्यांच्या निविदा २०१३ मध्ये निघाल्या. त्यावेळी रस्त्यांची कामे झाली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप सरकारच्या माध्यमातून कामे झाल्याचे सांगतात,’ असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख भाजपकुमार थापाडे म्हणून केला.

‘शिवसेनेने २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना कोणती कामे केली, हे माझ्यासोबत एकाच व्यासपीठावरुन सांगावे,’ असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेला थेट आव्हान दिले. ‘शहर विकास हा माझ्यासाठी आवडीचा विषय आहे. तो राजकारणाचा आणि पैसे खाण्याचा विषय नाही. उज्जैनच्या कुंभमेळ्यात कमी भाविकांची उपस्थिती असूनही त्या ठिकाणी केंद्र सरकारने जास्त निधी दिला. मात्र भाविकांची संख्या जास्त असूनही नाशिकमधील कुंभमेळ्याला अतिशय तुंटपुजा निधी देण्यात आला. मात्र तरीही नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळेच नाशिकच्या महापौरांचा अमेरिकेत सत्कार झाला,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी नाशिकमधील विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली.

Live Updates
20:39 (IST) 17 Feb 2017
पुन्हा मनसे हवी की भ्रष्ट पक्ष हवेत हे नाशिककरांनी ठरवावं- राज ठाकरे
20:38 (IST) 17 Feb 2017
बाकीच्या पक्षांना फक्त ओरबाडून पैसे खायचे आहेत- राज ठाकरे
20:37 (IST) 17 Feb 2017
काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने दोन वर्षे नाशिकला आयुक्तच दिला नाही- राज ठाकरे
20:36 (IST) 17 Feb 2017
टेंडरच्या माध्यमातून पैसे खाण्याची मला सवय नाही- राज ठाकरे
20:33 (IST) 17 Feb 2017
एलटी, जीवीके, टाटा, महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या सीएसआरमधून नाशिकमध्ये अनेक कामं- राज ठाकरे
20:28 (IST) 17 Feb 2017
आतापर्यंत जे कामं केलं, ते मनापासून केलं- राज ठाकरे
20:28 (IST) 17 Feb 2017
भ्रष्टाचार करु दिला नाही, म्हणून अनेकांनी पक्ष सोडला- राज ठाकरे
20:26 (IST) 17 Feb 2017
भाजपकडून ८८ गुन्हेगारांना निवडणुकीचं तिकीट- राज ठाकरे
20:26 (IST) 17 Feb 2017
भाजपने पैसे फेकल्याने काहीजण त्यांच्याकडे गेले- राज ठाकरे
20:26 (IST) 17 Feb 2017
शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी २०० घंटागाड्या- राज ठाकरे
20:25 (IST) 17 Feb 2017
शहर विकास हा माझा आवडीचा विषय; राजकारणाचा नाही- राज ठाकरे
20:22 (IST) 17 Feb 2017
पुढील ४० वर्षे नाशिकला २४ तास पाणी मिळेल- राज ठाकरे
20:18 (IST) 17 Feb 2017
नाशिकमधील रस्त्यांच्या कामाच्या निविदा २०१३ मध्ये निघाल्या. तरीही मुख्यमंत्री भाजपने मदत केल्याचं सांगतात- राज ठाकरे
20:16 (IST) 17 Feb 2017
अमेरिकेत आमच्या महापौरांचा सत्कार झाला- राज ठाकरे
20:15 (IST) 17 Feb 2017
शिवसेनेनं २५ वर्षांमध्ये काय केलं, हे माझ्यासोबत उभं राहून एकाच व्यासपीठावरुन सांगावं- राज ठाकरे
20:13 (IST) 17 Feb 2017
नाशिक महापालिकेवर गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही- राज ठाकरे
20:12 (IST) 17 Feb 2017
१९५२ साली स्थापनेपासून जनसंघ ते भाजप प्रवास करणाऱ्या पक्षाला स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत?: राज ठाकरे
20:12 (IST) 17 Feb 2017
शिवसेना, भाजपने नाशिकमध्ये गंभीर गुन्हे असलेले ८८ उमेदवार उभे केले आहेत. जे राष्ट्रवादी करत होती, तेच भाजप करत आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे – राज ठाकरे
20:12 (IST) 17 Feb 2017
ही विकास नियमावली अस्तित्वात आली तर, नाशिककरांना शहराबाहेर पडावे लागेल. निम्मे नाशिक विस्थापित होईल – राज ठाकरे
20:12 (IST) 17 Feb 2017
नाशिकची व्हायरल झालेली विकास नियमावली असे सांगते की, ९ मीटरच्या खालील रस्त्यांवरील घरांना वाढीव एफएसआय मिळणार नाही – राज ठाकरे
20:12 (IST) 17 Feb 2017
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करायचे असेल तर, गड-किल्ल्यांची नीट निगा राखा, ती खरी स्मारके. पुतळे कशाला हवेत? – राज ठाकरे
20:12 (IST) 17 Feb 2017
थापेबाज मुख्यमंत्री उद्या नाशिकमध्ये येऊन थापा मारतील. मेट्रो, मोनो, विमानतळ उभारण्याची वाट्टेल ती आश्वासने देतील – राज ठाकरे
20:11 (IST) 17 Feb 2017
कल्याण डोंबिवलीला साडेसहा हजार कोटी देणार होते. एक रुपयाही दिलेला नाही- राज
20:11 (IST) 17 Feb 2017
थापाला पर्यायी शब्द म्हणजे भाजपा, मुख्यमंत्री हे तर भाजपकुमार थापाडे- राज ठाकरे