तीन नगरसेवकांचा पक्षात प्रवेश; परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी व्यूहरचना जोमात

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, परस्परांवर कुरघोडीची व्यूहरचना जोमात असून त्या अंतर्गत सत्ताधारी मनसे आणि राष्ट्रवादीला धक्का देण्यास शिवसेना पुन्हा एकदा यशस्वी झाली. मनसेच्या रत्नमाला राणे तर राष्ट्रवादीचे नैया खैरे यांच्यासह पूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेले डी. जी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. पुढील काळात भाजप व काँग्रेसचेही काही नगरसेवक पक्षात येणार असल्याचा दावा शिवसेनेने केल्यामुळे सर्वपक्षीयांमध्ये चिंतेचे सावट आहे.

पालिका निवडणुकीला वर्षभराचा अवकाश असला तरी त्याची नेपथ्यरचना कधीच सुरू झाली आहे. भाजपविरोधात रान उठवत शिवसेना मनसेला खिंडार पाडण्यात यशस्वी झाली. काही दिवसांपूर्वी मनसेचे माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, आर. डी. धोंगडे व अरविंद शेळके यांनी सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा मनसेचा एक, राष्ट्रवादीचे एक यांच्यासह हकालपट्टी केलेल्या अशा एकूण तीन नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला. छगन भुजबळ यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नैया खैरे यांनी सेनेची वाट धरली. मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. सूर्यवंशी यांना पुन्हा प्रवेश दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सेनेचे नगरसेवक असणारे सूर्यवंशी यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. आता वरिष्ठांनी त्यांना पुन्हा पावन करून घेतल्यामुळे शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

सत्ताधारी मनसेत गळती सुरू असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे मळभ दाटले आहे. इतर राजकीय पक्षांची वेगळी स्थिती नाही. पुढील काळात काँग्रेस व भाजपचे नगरसेवकही शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आपल्या नगरसेवकांनी कुठेही जाऊ नये याकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे.

पक्षादेशाचा अनादर; मनसेच्या दोघांचे सदस्यत्व रद्द

महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून मनसेच्या शोभना शिंदे व संपत शेलार यांचे सदस्यत्व विभागीय महसूल आयुक्तांनी रद्द केले आहे. या संदर्भात मनसेने तक्रार करून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. मनसेच्या नगरसेवकांचे पक्षांतर सुरू असताना हा निकाल आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत सर्व नगरसेवकांना पक्षादेश बजावण्यात आला होता. त्या वेळी दोघांनी पक्षादेशाचे पालन न करता विरोधी म्हणजे सेनेच्या उमेदवारास मतदान करून बंडखोरी केली. या प्रकरणी मनसेने तक्रार करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली होती. विभागीय आयुक्तांसमोर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन मंगळवारी निकाल जाहीर झाला. या दोघांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.