|| अनिकेत साठे

नाशिकमध्ये नव्या समीकरणांची नांदी
नाशिक : शहरातील उत्कर्षाचे दिवस आठवून मनसेने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू के ली आहे. सध्या मनसेचे पाच नगरसेवक आहेत. याआधीच्या पाच वर्षात ती संख्या ४० होती. तेव्हा मनसेने राज्यातील पहिली महापालिका ताब्यात घेऊन इतिहास रचला होता. सत्ताकाळाच्या अखेरच्या पर्वात बहुतेकांनी भाजपची वाट धरली. पदाधिकारी, माजी आमदारांनी पक्षांतर केले. उंचावलेला आलेख तितक्याच वेगात उतरंडीला लागला. पुढे भाजपशी सौहार्दाचे संबंध ठेवल्याने महापालिकेत विरोधाची धार बोथट झाली. संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष झाले. गतकाळातील या घटनाक्रमातून बाहेर पडत आगामी निवडणुकीसाठी नव्या दमाच्या अमित ठाकरे यांच्यावर धुरा सोपविली जाणार आहे. परंतु, त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. पाच वर्षांपूर्वी नगरसेवकांनी जो निर्णय घेतला होता, बहुदा तोच मार्ग अनुसरण्याची वेळ मनसेवर आल्याचे राज ठाकरे यांच्या दौऱ्यात अधोरेखित झाले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, डळमळीत झालेल्या पक्ष संघटनेला पुन्हा उभारी देण्याचे काम मनसेने हाती घेतले आहे. त्यासाठीच राज हे जवळपास दोन वर्षानंतर पक्षाचा आढावा घेण्यासाठी पहिल्यांदा नाशकात आले होते. त्याच सुमारास मनविसेचे  आदित्य शिरोडकर यांनी शिवबंधन बांधत मनसेला धक्का दिला. त्यामुळे तातडीने कार्यक्रमात बदल केले गेले. अमित ठाकरे यांना नाशिकला बोलाविण्यात आले. मनविसेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याची चर्चा सुरू झाली. राजगड कार्यालयात दणक्यात स्वागत झाले.

अमित यांच्यासह संदीप देशपांडे यांनी पदाधिकाऱ्याशी संवाद साधला. प्रभागनिहाय राजकीय स्थिती जाणून घेतली. राज हे पक्ष कार्यालयात आले नाहीत. त्यांना भेटण्यासाठी विश्रामगृहात नेहमीप्रमाणे गर्दी उसळली होती. त्यांनी तिथेच गाठीभेटी घेतल्या. २७ जुलै रोजी पुन्हा येणार असल्याचे सांगत राज यांनी नाशिक सोडले.

या दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची धावती भेट झाली. भेटीतील तपशील नंतर पाटील यांनी जाहीर केला. परप्रांतीयांविरोधातील भूमिकेत बदल झाल्यास मनसेशी युतीचा विचार होऊ शकतो, असे संकेत भाजपने आधीच दिले होते.

राज यांनी परप्रांतीयांविषयीची आपली नेमकी भूमिका जाणून घेण्यास सुचविल्याचे भाजप प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. भाजपशी घरोबा करणे मनसेसाठी अपरिहार्य ठरल्याचे चित्र समोर आले.

मोठी पडझड

खरे तर स्थापना झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदा नाशिकमध्ये मनसेला लक्षणीय यश मिळाले होते. विधानसभेत तीन आमदार, नंतर महापालिका ताब्यात आली होती. परंतु, ही सत्ता पुढे राखता आली नाही. अनेक नगरसेवक, आमदार, पदाधिकाऱ्यानी मनसेला सोडचिठ्ठी दिली. ही पडझड रोखली गेली नाही.

कामे करूनही नाशिककरांनी नाकारल्याची सल राज यांच्या मनात कायम राहिली. अनेकदा त्यांनी ती बोलूनही दाखविली. बहुदा त्यामुळे त्यांनी स्थानिक पक्ष संघटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. पदाधिकारी दिशाहीन झाले. त्याचा फटका मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत बसला होता. महापालिकेत मनसेची भाजपप्रेमी भूमिका राहिली.

पदाधिकाऱ्यानी अमित ठाकरे यांच्यासमोर अनेक विषय मांडले. काही घटक पक्ष बांधणीऐवजी स्वत:चे स्थान बळकट करतात. नंतर पक्षांतराद्वारे नगरसेवक, आमदारकी पदरात पाडून घेतात. हे वेळीच ओळखून चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल, याकडे लक्ष वेधले गेले. अशा विविध प्रश्नांवर राज हे कसा तोडगा काढणार, याकडे पदाधिकाऱ्याचे लक्ष आहे

अमित ठाकरे यांचा दौरा

अमित ठाकरे यांना नाशिकला बोलाविण्यात आले. मनविसेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याची चर्चा सुरू झाली. राजगड कार्यालयात दणक्यात स्वागत झाले. अमित यांच्यासह संदीप देशपांडे यांनी पदाधिकाऱ्याशी संवाद साधला. प्रभागनिहाय राजकीय स्थिती जाणून घेतली.  राज हे पक्ष कार्यालयात आले नाहीत. त्यांना भेटण्यासाठी विश्रामगृहात नेहमीप्रमाणे गर्दी उसळली होती. २७ जुलै रोजी पुन्हा येणार असल्याचे सांगत राज यांनी नाशिक सोडले.