वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या नाशिकरोड कारागृहात कैद्याकडे पुन्हा एकदा भ्रमणध्वनी आढळून आला. बराकमधून तो भ्रमणध्वनीद्वारे बोलत असताना कारागृहातील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी कारागृहात अचानक झालेल्या तपासणीत १२ भ्रमणध्वनी सापडले होते.

मागील महिन्यात कर्मचारी कैद्यांना अंमली पदार्थ पुरवण्याचे प्रकरण चर्चेत असतांना बुधवारी पुन्हा तसाच प्रकार घडला. कारागृहात पूर्वेकडील बाजूस असलेल्या बॅरेकमधील कैदी प्रकाश राहुल लांडगे (२९) हा कोणाशी तरी भ्रमणध्वनीवर बोलत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लांडगेकडून ५००० किंमतीचा सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी व बॅटरी हस्तगत केली.

परवानगी नसतांना भ्रमणध्वनी बाळगल्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कारागृहाच्या आवारात आक्षेपार्ह वस्तू आढळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मध्यंतरी गृहरक्षकांकडून कैद्यांना भ्रमणध्वनी पुरविण्यात येत असल्याचे उघड झाले होते. कैद्यांना कारागृहातील कोणीतरी रसद पुरवण्याचे काम आजही करत असल्याचे या घटनेने दर्शवले आहे.