15 December 2018

News Flash

रंगपंचमीत परंपरेसह आधुनिकतेचा उत्साह

जिल्ह्य़ात होळी, धुलिवंदन या सणांना रंग उडविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडीत रंगपंचमीचा आनंद घेताना युवावर्ग 

नाशिकमध्ये रहाड, तर येवल्यात रंगांचा सामना

जुन्या नाशिकसह पंचवटीत शहराची पेशवेकालीन रहाड परंपरेची जपवणूक करतानाच डिजे, रेन डान्स अशा आधुनिकतेची संगत करीत नाशिककरांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. शहरात रंगपंचमीचा असा उत्साह असतांना येवला, कसबे सुकेणे येथेही परंपरेनुसार रंगांचे सामने खेळण्यात आले.

जिल्ह्य़ात होळी, धुलिवंदन या सणांना रंग उडविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. रंगपंचमी मात्र अपूर्व उत्साहात साजरी केली जाते. नाशिकच्या रंगपंचमीला पेशवेकालीन वारसा आहे. जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात पेशवेकालीन रहाडी असून रंगपंचमीसाठी या रहाडी उकरण्यात येतात. त्यांची स्वच्छता करून पर्यावरणपूरक रंग आणि पाण्याने रहाड भरण्यात येते. रंगपंचमीच्या दिवशी पूजन करून मग रहाडीत डुंबण्याची मजा घेतली जाते. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेची जपवणूक यंदाही करण्यात आली. मंगळवारी सकाळपासूनच रहाड परिसरात रंगप्रेमींसाठी डीजेचा दणदणाट सुरू होता. रहाडीत रंगल्यानंतर डीजेच्या तालावर तरुणाई बेफान होऊन नाचण्यात गुंग झाली. रहाड परिसर असा रंगीत-संगीत झाला असतांना गुलालवाडी, भद्रकाली, कॉलेज रोड परिसरात रेन डान्सची व्यवस्था करण्यात आली होती. रेन डान्स करताना चिंब होणाऱ्यांमध्ये युवतींचाही सहभाग राहिला. कॉलनी परिसरातही हम भी किसी से कम नही हे दाखविण्यासाठी पाण्याचा टॅंकर मागवत, तर काही ठिकाणी हौद, पिंप पाण्याने भरत मोठय़ा आवाजात टेपवर गाणे लहान-मोठय़ांनी एकमेकांना रंग लावत, भिजत रंगपंचमी साजरी केली. काही वसाहत परिसरात रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. रंगपंचमीची क्षणचित्रे आपल्या भ्रमणध्वनीत ‘सेल्फी’च्या माध्यमातून कैद करण्याची स्पर्धा सर्वत्र दिसून आली. अनेकांनी आपले चित्र-विचित्र रंगीत चेहरे समाज माध्यमांवर टाकत पैचान कोण, असा सवालही केला. शहरातील शंभवी इम्पोवरिंग वूमन संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक कोरडी रंगपंचमी खेळा हा संदेश कृतीतून दिला. यासाठी  शंभवीच्या सर्व सदस्यांनी फुलांच्या माळा, पाकळ्या तसेच बीटपासून लाल रंग, तांदळाच्या पिठात नैसर्गिक रंग टाकत गुलाबाच्या पाकळ्या तसेच गुलाबजल, चंदन भुकटी वापरत पर्यावरणपूरक रंगपंचमीचा आनंद घेतला. यावेळी संचालिका सोफिया कपाडिया, नीता नारंग, ॠतुजा कुलकर्णी आदी उपस्थित होते. महिंद्रा आणि महिंद्रा लि, यश फाऊंडेशनच्या वतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांसाठी महिंद्रा हरियाली येथे रंगपंचमीनिमित्त विशेष कार्यक्रम झाला.

येवल्यात रंगांचा सामना

पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या संस्कृती आणि उत्सवप्रिय येवल्याची रंगपंचमीच्या दिवशी होणाऱ्या रंगांच्या सामन्यासाठीही ओळख निर्माण झाली आहे. यंदाही तोच जोष, त्याच उत्साहात येवलेकरांनी सामना खेळत रंगपंचमीचा आनंद लुटला. टिळक मैदान आणि डि. जे. रस्त्यावरील रंगांच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इमारतींची गच्ची, सज्जे, ओटे सर्वच गर्दीने ओसंडून वाहत होते. दुतर्फा जमलेल्या हजारो रंगप्रेमींच्या साक्षीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रंगाने भरलेले पिंप असलेले ट्रॅक्टर समोरासमोर येण्यास सुरूवात झाली. दोन्ही बाजूचे ट्रॅक्टर पुढे पुढे जाण्यास सुरूवात होताच रंगांच्या सामन्यालाही सुरूवात झाली. पिंपातील रंगांचा परस्परावर वर्षांव करीत दोन्हीही बाजू बेफान झाल्या होत्या. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गर्दीचाही उत्साह बघण्याजोगा होता. वेगवेगळ्या रंगांमुळे जणू काही इंद्रधनुष्य अवतरल्याचा भास येत होता. शहरातील तालीम मंडळ आणि इतर मंडळांच्या सुमारे ५० गटांनी या सामन्यामध्ये सहभाग घेतला. या सामन्यांमुळे रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. चौकाचौकात डीजेवर युवावर्ग रंगाची उधळण करीत होते. हालकडीच्या वाद्यावर गल्लीतून फिरून अनेकांनी एकमेकांना रंग लावला. ठिकठिकाणी रंगाचे टीप ठेवून दुपारी चारपर्यंत आनंद लुटणारे येवलेकर सायंकाळी पाचला टिळक मैदानात व डीजे रोडवर आले. सायंकाळी पाचनंतर मैदानात रंगाचे सामने रंगले.

First Published on March 8, 2018 1:52 am

Web Title: modern excitement in nashik traditional holi 2018