18 July 2019

News Flash

निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टिंग’, चार अ‍ॅप्सची निर्मिती

(संग्रहित छायाचित्र)

मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टिंग’, चार अ‍ॅप्सची निर्मिती

नाशिक : यंदाची लोकसभा निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यात आली आहे.

प्रचारार्थ उमेदवारांना सहज परवानगी देण्यापासून ते मतदारांना आचारसंहिताभंगाची तक्रार नोंदविण्यापर्यंतच्या कामांकरिता ‘सुविधा’, ‘सुगम’, ‘पीडब्लूडी’, ‘सिविजील’ या चार अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच काही निवडक मतदार केंद्रावरील मतदान प्रक्रिया वेबकास्टिंगद्वारे पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) अरुण आनंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आचारसंहिताभंग होत असल्याचे दिसल्यास नागरिकांनी पाच मिनिटांच्या आत सिविजील अ‍ॅपवर तक्रार केल्यावर १५ मिनिटांत कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. उमेदवारांना आवश्यक परवानगी देण्यासाठी निर्मिलेल्या सुविधा अ‍ॅपने त्यांची दमछाक काही प्रमाणात कमी होणार असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर होणार आहे. समाधान पोर्टलचाही तक्रार निवारणासाठी उपयोग करण्यात येणार आहे. उमेदवार, मतदार आणि शासकीय यंत्रणा अशा सर्वाचा विचार करून कामकाज पारदर्शक, सुसह्य़ करण्याच्या दृष्टिकोनातून विविध अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी समान संधी मिळायली हवी. जाहीर प्रचार सभा, प्रचार फेरी यासाठी मैदानांसह तत्सम बाबींच्या परवानग्यांसाठी उमेदवारांना सुविधा अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणी करता येणार असल्याने प्रचाराच्या धामधुमीत संबंधितांची धावपळ कमी होईल, असेही सांगण्यात आले.

प्रचारार्थ वापरावयाच्या वाहनांची परवानगी सुगम अ‍ॅपद्वारे मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित निवडणूक कामांसाठी पीडब्लूडी अ‍ॅप कार्यरत राहील. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत नागरिक अर्थात मतदारांचे साहाय्य घेतले जाईल. त्याकरिता खास सिविजील अ‍ॅप कार्यरत राहील. या अ‍ॅपद्वारे कोणालाही तक्रार नोंदविता येणार असून आचारसंहिताभंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याची सूचना तात्काळ या अ‍ॅपद्वारे यंत्रणेला द्यायची आहे. निवडणूक यंत्रणेचे पथक घटनास्थळी धडकून पुढील कार्यवाही करणार आहे.

माहितीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक

आधुनिक तंत्रज्ञानासोबत काही पारंपरिक मार्ग कायम असून निवडणुकी संदर्भातील माहितीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. या क्रमांकावर मतदाराला सर्व माहिती मिळेल. शिवाय आचारसंहिताभंगाची तक्रार करायची असल्यास नाव गुप्त ठेवता येईल

– राधाकृष्णन

First Published on March 12, 2019 3:07 am

Web Title: modern technology use in lok sabha election 2019