News Flash

नेपाळला हिंदू राष्ट्राचा दर्जा मिळण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा

धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीच्या अनागोंदी कारभाराला नेपाळी जनता विटली आहे.

सिंहस्थातील साधू, महंतांची मागणी

धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीच्या अनागोंदी कारभाराला नेपाळी जनता विटली आहे. धुमसत्या नेपाळमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र जाहीर करणे हाच एकमेव उपाय असून त्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीसह सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधू-महंतांनी केली आहे. धर्मनिरपेक्ष भारतात बहुसंख्य हिंदुंना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. उलट अल्पसंख्यांकांचे लांगूनचालन केले जाते. ही बाब नेपाळमध्ये होण्यास वेळ लागणार नाही, या धोक्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले.
नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र होणे ही भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरणार आहे. हे लक्षात घेऊन चीनही नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र करण्यासाठी धडपडत आहे. मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये नवीन राज्यघटना बनविण्याचे काम सुरू असून भारताने त्यात मित्रराष्ट्र म्हणून हस्तक्षेप करावा, अशी मागणी छत्तीसगड मंडपचे बालयोगेश्वर रामबालकदास महाराज, अयोध्या पुनर्निमाण ट्रस्टचे महंत देवरामदास वेदांत महाराज आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत केली. काही वर्षांपूर्वी नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. भारतातील हिंदू धर्मियांसाठी ती अभिमानाची बाब होती. काँग्रेसच्या कार्यकाळात नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न झाले. यामुळे नेपाळमधील हिंदुंच्या मनात रोष आहे. २००७ पासून नेपाळमध्ये पाच लाख हिंदुंचे धर्मातर करण्यात आले. तेथील ८२ टक्के हिंदुंची हिंदू राष्ट्र ही मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून नेपाळची राज्यघटना धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी जाहीर केल्यास आणि या प्रक्रियेत मोदी सरकारने तटस्थ भूमिका घेतल्यास ती मोठी चूक ठरेल, असा इशारा पिंगळे यांनी दिला. कोणत्याही स्थितीत नेपाळला हिंदू राष्ट्र जाहीर करणे हे भारताच्या हिताचे आहे. परराष्ट्र धोरणाच्यादृष्टिने ही महत्वाची बाब आहे. नेपाळमधील बहुसंख्यांकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी हिंदू राष्ट्र व्हावे, अशी सनातन संस्थेची भूमिका असल्याचे प्रसारसेविका स्वाती खाडय़े यांनी नमूद केले.
पंतप्रधानांवर शरसंधान
वैश्विक पातळीवर आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी धडपड करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यामुळे आपण सत्तारूढ झालो, त्या हिंदुंच्या प्रश्नांकडेही थोडे लक्ष द्यावे, अशा शब्दात रामबालकदास महाराजांनी शरसंधान साधले. पंतप्रधान जगाचे दौरे करतात, तेथील स्थिती जाणून घेतात. पण भारताशेजारील नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये हिंदुंची काय स्थिती, हे त्यांनी कधी लक्षात घेतले नाही. उपरोक्त राष्ट्रांचाही त्यांनी दौरा करावा, असा सल्ला महाराजांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 8:10 am

Web Title: modi should take initiative to give hindu nation status to nepal
टॅग : Nepal
Next Stories
1 साधुग्राममधील‘ती’ घटना पोलिसांच्या दृष्टीने बेदखल
2 सिंहस्थाकडे लक्ष देण्याविषयी भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
3 नोकरीच्या आमिषाने धर्मातराचा संशय ; बहिणीची पोलिसांत तक्रार
Just Now!
X