गोदावरीच्या महापुरात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदा उद्यानाची वाताहात झाली आहे. पूररेषेत झालेल्या विकासकामांमुळे गोदावरी पात्राचा संकोच झाला असून यावर पाटबंधारे विभागाने वारंवार आक्षेप नोंदविला आहे. महापुराच्या तडाख्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रस्तावित गोदावरी सुशोभीकरण सौंदर्यीकरण प्रकल्पात अनेक फेरबदल करण्याची तयारी स्मार्ट सिटी कंपनीने सुरू केली आहे.

शहरातून जवळपास १९ किलोमीटर लांब आणि १०० फूट रुंदीचे गोदावरीचे नदीपात्र प्रवाहित होते. रामकुंड परिसरात झालेली घाटाची बांधणी, कमी उंचीचे पूल, होळकर पुलाखालील बंधारा आदींमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याची बाब पाटबंधारे विभागाने वारंवार अधोरेखित केली आहे. काही दिवसांपूर्वी गोदावरीच्या महापुराने शहरास तडाखा दिला. नदीपात्रालगतच्या व्यापारी पेठा, निवासी भाग पाण्याखाली बुडाला. पुलांचे कठडे तुटले. रामसेतूचे बरेच नुकसान झाले. यातून गंगापूर रस्त्यावरील गोदा उद्यानही बचावले नाही. याआधीच्या दोन महापुरांमध्ये त्याची जी अवस्था झाली, तशीच अवस्था यावेळीही झाली आहे. गोदा उद्यानातील भ्रमंती करण्याच्या मार्गावरील दिवे भुईसपाट झाले असून फरशा इतक्या तुटल्या की, चालणेही अवघड झाले आहे. अनेक भागांत गाळ पसरला आहे.

गोदावरीच्या काठावर हा प्रकल्प साकारला जाणार असून होळकर पूल ते वन विभागाची नर्सरी या दरम्यान नदीपात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. होळकर पुलाखालील जुना बंधारा काढून तिथे स्वयंचलित दरवाजे बसविले जातील. नदीपात्राचे सुशोभीकरण करून पर्यटकांना विविध सोयी-सुविधा प्रस्तावित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात हेरिटेज वॉक, आसन व्यवस्था, अ‍ॅम्पी थिएटर आदींचा समावेश आहे. साडेतीनशे कोटींचा हा प्रकल्प महापुराच्या तडाख्याने अडचणीत आला. पूररेषेत आधीच महापालिकेने अनेक प्रकल्प साकारले आहेत. त्यात नव्याने भर घालण्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर प्रशासनाने या प्रकल्पाची पडताळणी करण्याची सूचना केली. त्यानुसार स्मार्ट सिटी कंपनी गोदा प्रकल्पाच्या आराखडय़ात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीला लागली आहे.

पुराने नुकसान होऊ न देण्याची दक्षता

गोदावरी पात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. पात्रातील गाळ त्यास कारणीभूत आहे. ही क्षमता वाढविण्यासाठी पात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुराच्या पाण्याने प्रकल्पातील सोयी-सुविधांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्याकरिता गोदा उद्यानावेळी ज्या उणिवा राहिल्या, त्या लक्षात घेऊन बदल केले जातील. ‘हेरिटेज वॉक’च्या व्यवस्थेत पात्रापासून ते अधिक उंचीवर ठेवले जाईल. जेणेकरून पुरात त्याचे नुकसान होणार नाही. वेगवेगळ्या बाबींवर सध्या आराखडय़ात बदल करण्याचे काम सुरू आहे. गोदावरी प्रकल्प सरसकट रद्द होणार नाही. गरजेनुसार त्यात बदल होतील, असे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.