सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : नर्मदा परिक्रमा करून खासगी बसने अंकलेश्वरहून नाशिककडे परतणाऱ्या उच्चशिक्षित महिलेचा प्रवासादरम्यान चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकला आल्यावर महिलेने संशयिताला जाब विचारला, त्याचे म्हणणे चित्रित करून चित्रफीत समाजमाध्यमात टाकण्यात आली. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना उघडे पाडण्यासाठी असे केल्याचा दावा पीडितेने केला आहे. अंकलेश्वर-नाशिक प्रवासात घडलेल्या या प्रकाराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु पोलीस तक्रार घेण्यास तयार नव्हते. अखेर महिलेने पोलीस आयुक्तांकडे दाद मागितल्यावर सूत्रे फिरली. शहरातील उच्चशिक्षित महिला नर्मदा परिक्रमेसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये गेली होती. परिक्रमेदरम्यान पायाला दुखापत झाल्यामुळे महिलेला तक्रार देण्यास विलंब झाला. पीडितेने तक्रारीत घटनाक्रमाची माहिती दिली.

परिक्रमेवरून घरी परतण्यासाठी आपण खासगी प्रवासी वाहतूक कंपनीच्या बसची तिकीट नोंदणी केली होती. अंकलेश्वरहून रात्री निघणारी ही बस नाशिकला दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचते. संपूर्ण बसमध्ये तक्रारदार एकटीच महिला प्रवासी होती. विनयभंग करणारी व्यक्ती बसचा पर्यायी चालक होता. आपण आरडाओरड केली. परंतु इतर प्रवासी झोपेत असल्याने मदतीला कोणी आले नसल्याचे महिलेने म्हटले आहे. पायाला दुखापत झाली असल्याने चालणे अवघड झाले होते. बस नाशिकला पोहोचल्यानंतर संशयित चालकाला जाब विचारला. संशयिताने आपली चूक मान्य करत वेगवेगळी कारणे देण्याचा प्रयत्न केला. त्याचा जबाब तक्रारदाराने भ्रमणध्वनित चित्रित केला.

अशा गंभीर प्रकरणात पोलीस यंत्रणा साधी तक्रार नोंदवून घेण्यास तयार नसल्याचा अनुभव पीडितेला आला. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांना हा प्रकार ज्या महामार्गावर घडला, तेथील पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असा सल्ला देण्यात आला. यामुळे महिलेने थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली. त्यानंतर  गुन्हा दाखल करण्यात  आला.