शहरात २० पेक्षा अधिक ठिकाणी फांद्या, वृक्ष कोसळले

शहरासह ग्रामीण भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. इगतपुरीत जोरदार, तर नाशिक शहरासह मनमाड, त्र्यंबकेश्वर येथे त्याने तुरळक स्वरुपात हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरात २० हून अधिक ठिकाणी झाडे तसेच फांद्या कोसळल्या. पावसाने शहरवासीयांची काही काळ तारांबळ उडवली होती. वीज वाहिन्यांवर झाड, फांद्या कोसळल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. मनमाड येथे कांद्याची चाळ कोसळून दहा लाखाचे नुकसान झाले.

ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. काही धरणे कोरडीठाक पडली असून अनेक धरण तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी पेरण्याही रखडल्या आहेत. हंगामाच्या प्रारंभीच हुलकावणी देणाऱ्या पावसाचे बुधवारी काही भागात आगमन झाले. सकाळपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. शहरात १० ते १५ मिनिटे पाऊस पडला. वाऱ्यामुळे अनेक भागात रस्ते, घरांवर झाडे, फांद्या पडल्या.

वीज तारा तुटल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यावर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी काही भागात दुरुस्तीचे काम सुरू होते. फांद्या, झाडे कोसळल्याने काही रस्त्यांवर वाहतुकीत अडथळे आले. झाडे कोसळल्याच्या सुमारे २० तक्रारी आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दलाच्या पथकाने ही झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. काही मिनिटांच्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली.

ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मनमाड, त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी तुरळक सरी कोसळल्या. मागील २४ तासात जिल्ह्य़ात ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सिन्नर, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यात पाऊस झाला.

मनमाड येथे रात्री वादळी वाऱ्यात कांदा चाळ कोसळली. त्यात चाळीचे नुकसान होऊन चार लाखाचा कांदा भिजला. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने काही शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या केल्या होत्या.

काही हवामान तज्ज्ञांच्या मते बुधवारी पडलेला मौसमी पाऊस आहे. पावसाचे अद्याप आगमन झालेले नाही. मृग नक्षत्रात तुरळक का होईना पावसाने हजेरी लावल्याने आता पुन्हा खरीप हंगासाठी शेतकरी तयारीला लागले आहे.

महामार्गावरील वाहतूक संथ

दुपारी साडेचार वाजता वादळी पावसाने इगतपुरी आणि घोटी शहरात पाणीच पाणी झाले. इगतपुरी तालुक्यात सकाळपासून वातावरणात कमालीची उष्णता जाणवत होती. त्यामुळे जोरदार पाऊस होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मुसळधार पावसाने विजेचा लपंडाव सुरू होता. दुकानदार, फेरीवाले आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले. बाजारात आलेल्या महिलांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ संथ झाली. इगतपुरी, घोटी परिसरासह दौंडत, देवळे, कावनई, कोरपगाव, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, काळुस्ते, कांचनगाव, उभाडे या परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे.