News Flash

भाजपची अधिक मते फुटणार?

अपक्ष उमेदवाराला डावलल्याची किंमत पक्षाला मोजावी लागणार असल्याचे सांगितले जाते

(संग्रहित छायाचित्र)

विधान परिषद निवडणूक; राजकीय वर्तुळातील निष्कर्ष

नाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारात महिनाभरापासून धावपळ करणाऱ्या उमेदवारांना मतदान प्रक्रियेनंतर काहीसा दिलासा मिळाला. उभय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात असताना भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवाराला ऐन वेळी डावलल्याचा संताप मतपेटीतून व्यक्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. संदिग्ध भूमिकेमुळे भाजपच्या मतांची मोठय़ा प्रमाणात फाटाफूट झाल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात आहे.

विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांच्यात लढत आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु लगोलग मतांची आकडेमोड सुरू झाली. जिल्ह्य़ात या निवडणुकीसाठी ६४४ मतदार होते. पक्षीय बलाबलाचा विचार करता शिवसेनेचे २०७, काँग्रेस आघाडी १७१, भाजप (मित्रपक्ष) १७८, माकप १३ आणि इतर छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून ७५ मतदार आहेत.

कोणत्याही पक्षाजवळ पहिल्या पसंतीची मते गाठण्याइतके संख्याबळ नसल्याने उमेदवार न देणाऱ्या भाजपच्या मतांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपने अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु तोवर पक्षात वेगवेगळे गट पडले. अपक्ष उमेदवाराला डावलल्याची किंमत पक्षाला मोजावी लागणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे भाजपच्या मतांचा राष्ट्रवादीला पूर्णपणे लाभ होणार नसल्याचे गृहीतक मांडले जात आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. सहाणे यांनी मंगळवारी विश्रांती घेताना मतदारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानण्यास प्राधान्य दिले. दुपापर्यंत १५० जणांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आघाडीच्या कोअर कमिटीची सायंकाळी बैठक पार पडली. कोणत्या भागातून किती मते मिळणार याची गोळाबेरीज करण्यात आली. काँग्रेस आघाडीच्या समीकरणानुसार ७० ते १०० मतांनी जागा राखली जाईल, असा निष्कर्ष काढण्यात आला.

शिवसेनेचे उमेदवार दराडे यांनी मंगळवारी भ्रमणध्वनी बंद ठेवत आराम करणे पसंत केले. सेनेच्या गोटात कोणाचा पाठिंबा मिळाला, भाजपच्या राष्ट्रवादीला ऐन वेळी पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे परिणाम, जातीय समीकरणाचा लाभ आदींवर चर्चा सुरू आहे. भाजपने कोकणी यांना डावलल्याने त्र्यंबक, पेठ, मालेगाव भागातून भाजपसह त्यांना मानणाऱ्या सदस्यांनी सेनेला साथ देण्यात धन्यता मानली. मालेगावमधून राज्यमंत्री दादा भुसे यांचे मुस्लीम समाजाशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध कामी आल्याचे सांगितले जात आहे. जातीय आधारावर मतांचे विभाजन झाल्याचा लाभ सेनेच्या पदरात पडणार असल्याचा अनुमान काढला जात आहे. सेनेकडून दराडे यांच्या विजयाचा दावा करताना हे मुद्दे मांडण्यात येत आहेत.

भाजपला कोकणींना डावलल्याचा फटका?

राज्यातील समीकरणे लक्षात घेऊन भाजपने ऐन वेळी साथ सोडल्याने परवेझ कोकणी यांची कोंडी झाली. भाजपचे समर्थन मिळेल या आशेवर ते रिंगणात उतरले होते. त्र्यंबकेश्वरमधील सदस्यांनी त्यांना डावलल्यावरून भाजपच्या नेत्यांशी वाद घालून पक्षाचा आदेश न मानण्याचा पवित्रा स्वीकारला होता. असे अनेक ठिकाणी घडल्याचे सांगितले जाते. राजी-नाराजीची ही मते, जातीय समीकरणांवर झालेले विभाजन याचा लाभ कोणाच्या पदरात पडणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या घडामोडीत मोठे संख्याबळ राखणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या मतांची फाटाफूट होणार असल्याचे चित्र आहे. २४ मे रोजी मतमोजणी होईपर्यंत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्काना उधाण येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:50 am

Web Title: more bjp votes divided in legislative council election
Next Stories
1 अखेरच्या टप्प्यातही फूट पाडण्याचा प्रयत्न
2 सकाळी शुकशुकाट; दुपारनंतर गर्दी
3 नेचर क्लबच्या शाळेत पक्ष्यांचा किलबिलाट
Just Now!
X