शहर परिसरात अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत असताना मंगळवारी सकाळी उपनगर परिसरातील फर्नाडिस वाडीच्या मागील बाजूकडील अतिक्रमण हटाव मोहिमेत पोलीस प्रशासनाने सर्व शक्यतांचा विचार करत हा प्रश्न कौशल्याने हाताळला. पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने संवेदनशील भागात सर्वात मोठी धडक कारवाई शांततेत पार पाडली. शासकीय जमिनीवरील जवळपास १४० हून अधिक झोपडय़ा हटविण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
शहर परिसरात सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम धडकपणे राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मंगळवारी उपनगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर फर्नाडिसवाडी झोपडपट्टी येथील अतिक्रमण काढण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. हा भूखंड एका गृहनिर्माण संस्थेसाठी आरक्षित आहे. या संस्थेने महापालिकेकडे त्या अनुषंगाने वारंवार तक्रार केली होती.
तथापि, झोपडपट्टी हटविण्यास स्थानिकांचा विरोध होता. चार दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाने पालिका निवडणूक लक्षात या मोहिमेला विरोध दर्शवत मोर्चा काढला होता. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, राजकीय दबाव तंत्राद्वारे मंगळवारी मोहिमेत अडथळे येऊ शकतात ही शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणेने तयारी केली. सोमवारी रात्री बारा वाजेपासून उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झोपडपट्टी परिसरात मंगळवारी संपूर्ण झोपडपट्टी हटविण्यात येणार असल्याची पूर्वसूचना दिली. घरातील महिला, आबालवृद्धांना इजा होऊ नये तसेच घरातील वस्तूंचे नुकसान होऊ नये यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. याबाबत नागरिकांशी संवाद साधत त्यांना सुरक्षित स्थलांतर करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. यामुळे नागरिकांनी रात्रीपासून सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपर्यंत बहुतांश जणांनी जागा रिकामी केली होती. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण नियोजनामुळे अतिक्रमण हटाव मोहीम निधरेक पार पडली. तोपर्यंत महापालिकेला या घडामोडींबाबत थांगपत्तादेखील नसल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी साडे सात वाजता पालिका विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर १५०हून अधिक कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन या ठिकाणी दाखल झाले. पोलीसांचा फौजफाटा आणि पालिकेची तयारी पाहता नागरिकांनी कोणताही विरोध न करता आपले साहित्य आवरणे हिताचे समजले. नागरिकांनी कोणताही प्रतिकार न करता उलट प्रशासनाला सहकार्य केले. १२२ झोपडय़ा यावेळी हटविण्यात आल्या. सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. नाशिकरोड हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. आजपर्यंत ज्या ज्या वेळी या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबबिली गेली, त्या त्या वेळी कमालीचा विरोध झाला आहे. या एकंदर स्थितीत ही मोहीम शांततेत पार पडली. नाशिकरोड परिसरातील सर्वात मोठी धडक कारवाई असल्याचा दावा वाडेकर यांनी केला. यापुढे पालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार पुढील काळात मोहीम सुरू राहील असेही ते म्हणाले.

महापालिकेला थांगपत्ता नाही..
अतिक्रमण निर्मूलन मोहीम राजकीय मुद्दा होऊ नये यासाठी उपनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगत व कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून या परिसरात गस्त घालत हा परिसर मोकळा करावा, असे आवाहन केले. याच दरम्यान पोलीस किंवा अतिक्रमण निर्मूलन पथकाला विरोध दर्शविण्यासाठी स्थानिकांनी मोठय़ा आकाराचे दगड आणून ठेवले. ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांनी आधीच ते ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला. वास्तविक झोपडपट्टी हटाव हे काम पोलिसांचे नाही. त्यात कोणी विरोध केला असता तर त्याच्यावर लाठीमार करण्याची आमची भूमिका होती. मात्र हा संवेदनशील प्रश्न पोलिसांनी कौशल्याने हाताळला. पोलिसांकडून रात्रभर स्थानिकांना आवाहन करण्यात आले. याबाबत महापालिकेला थांगपत्ता नव्हता. सकाळपर्यंत बहुतांश नागरिकांची आवरासावर पूर्ण झाल्यामुळे त्यांनी दुसरीकडे जाण्यास सुरुवात केली होती.
– श्रीकांत धिवरे (पोलीस उपायुक्त)