मासिक गणनेत १२ रोहित पक्ष्यांची नोंद

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात १२ फ्लेिमंगोसह विविध प्रकारचे १५ हजाराहून अधिक पक्षी फेब्रुवारी महिन्यातील मासिक पक्षी प्रगणनेत आढळून आले. गुरूवारी सकाळच्या सत्रात झालेल्या या गणनेत गुलाबी मैना, वारकरी, चमचा बदक, उघडय़ा चोचीचा करकोचा, चित्रबलाक, जांभळा बगळा, राखी बगळा यांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले.

गुरुवारी सकाळीच नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वनअधिकारी, कर्मचारी, पक्षीमित्र, स्थानिक मार्गदर्शक, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या मदतीने पक्षी गणणा करण्यात आली. धरणातील पाण्याची पातळी वाढलेली असल्याने तसेच थंडी कमी झाल्याने काही परदेशी पक्षांचे स्थलांतर सुरू आहे. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, थानगावथडी, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव अशा पाच ठिकाणी केलेल्या पक्षीनिरीक्षणात विविध पाणपक्षी व झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या. यामध्ये १३,७७८ पाणपक्षी व एक हजार ५७८ झाडांवरील, गवताळ भागातील पक्षी असे एकूण पंधरा हजार ३५६ पक्षांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये गुलाबी मैना, वारकरी, चमचा बदक, उघडय़ा चोचीचा करकोचा, चित्रबलाक, जांभळा बगळा, राखी बगळा, कॉमन पोचार्ड स्पॉट बिल डक, गढवा, गारगेनी आदी पक्षी आढळून आले आहेत. याशिवाय १२ फ्लेमिंगो आढळले. पक्षी गणनेसाठी साहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक अश्विनी पाटील, वनरक्षक चंद्रमणी तांबे, पक्षीमित्र डॉ. उत्तम डेर्ले, प्रा. आनंद बोरा आदींनी या पक्षी गणनेत सहभाग घेतला.